लातूर: १४ एप्रिल रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य शासनाने जून २०२५ पासून लातूरच्या पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन मध्ये अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यासंबंधीचा शासकीय अध्यादेश अध्याप न निघाल्यामुळे महाविद्यालय सुरू होण्याची प्रक्रिया थंड बस्त्यात अडकली आहे.

१२ फेब्रुवारी २०२५ रोजी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जूनमध्ये लातूरला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले जाईल असे आश्वासन दिले होते. ५० कोटी रुपये खर्च करून इमारत बांधूनही दोन वर्षापासून ती इमारत धुळखात पडून राहिले असल्याचे वृत्त लोकसत्ताने प्रसिद्ध केले होते त्याची दखल घेऊन आमदार अभिमन्यू पवार व आमदार संजय बनसोडे यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे यासंबंधी पाठपुरावा केला होता.

परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेड या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत चार जिल्ह्यासाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नाही या ठिकाणच्या गरीब विद्यार्थ्यांची सोय यामुळे होणार आहे मात्र लाल फितीच्या कारभारात शासकीय अध्यादेश अध्याप निघालेला नाही. त्यामुळे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या मान्यतेची अद्याप प्रक्रिया सुरू झाली नाही.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्राध्यापक भरतीसाठी निधीही मंजूर झाला आहे मात्र आद्यादेशाविना सगळेजण हातावर हात ठेवून गप्प आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी या विषयी भाष्य करणे टाळले. जिल्ह्यातील दोन खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालये नव्याने मंजूर झाली आहेत मात्र शासकीय महाविद्यालय अद्याप सुरु होण्याची अनिश्चितता आहे.