देवस्थानांच्या टाळेबंदीमुळे अर्थचक्र रुतले

सोलापुरातील पंढरपूर, अक्कलकोटसह तुळजापूर, गाणगापूरलाही सर्वाधिक फटका 

(संग्रहित छायाचित्र)

एजाज हुसेन मुजावर

भारताची दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या पंढरपुरासह अक्कलकोट, तुळजापूर आदी प्रमुख देवस्थाने सोलापूरच्या आसपास आहेत. ही देवस्थाने बंद असल्यामुळे एकूणच सोलापूर जिल्ह्य़ातील अर्थकारण विस्कळीत झाले आहे. ते पूर्ववत होण्यासाठी देवस्थाने कधी उघडणार, याकडे सर्वाच्या नजरा लागल्या आहेत. येत्या दिवाळीत तरी देवस्थाने खुली होण्यासाठी धार्मिक पर्यटन क्षेत्राशी संबंधित अर्थकारणावर अवलंबून असलेल्या मंडळींनी अक्षरश: देव पाण्यात ठेवले आहेत.

सोलापूर जिल्ह्य़ात पंढरपूर आणि अक्कलकोट या दोन प्रमुख देवस्थानांसह जवळच तुळजापूर, गाणगापूर ही धार्मिक पर्यटनस्थळे आहेत. याशिवाय ऐतिहासिक पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेले विजयपूर (पूर्वीचे नाव विजापूर) सोलापूरजवळच आहे. या सर्व धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनस्थळांमध्ये दररोज हजारो भाविक आणि पर्यटक येतात. दरवर्षी सोलापूर जिल्ह्य़ात सुमारे दोन कोटी पर्यटक येतात. त्यातून होणारी आर्थिक उलाढाल प्रचंड मोठी आहे. येथील स्थानिक अर्थकारण धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनावर अवलंबून आहे. परंतु गेले सात-आठ महिने दर्शनासाठी देवस्थानेच बंद असल्यामुळे भाविकांची वर्दळच थांबली आहे. परिणामी, अर्थचक्र रुतून बसले आहे.

देवस्थानांवर अवलंबून असलेले पुष्पहार, फुले, नारळ, कुंकू, अबीर बुक्का विक्रेते आणि इतर प्रासादिक वस्तूंसह हॉटेल, लॉज, प्रवासी वाहतूकसेवा आदी एक ना अनेक घटकांना मोठा फटका बसला आहे. दैनंदिन व्यापारच सात-आठ महिन्यांपासून बंद राहिल्यामुळे संबंधित उद्योग-व्यापारात केलेली लाखोंची गुंतवणूक वाया गेली आहे. लहान-मोठय़ा व्यावसायिकांच्या गळ्याला बँका, अर्थपुरवठादार कंपन्या आणि खासगी सावकारांचा फास बसला आहे. नारळ, फूलविक्रेते, रिक्षाचालक आदी छोटय़ा घटकांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे.

पंढरपूरच्या विठ्ठल दर्शनासाठी दररोज २५ ते ३० हजार भाविक येतात. आषाढी, कार्तिकी, माघी, चैत्री या चार लहान-मोठय़ा यात्रांवर तर पंढरपूरचे सारे अर्थकारण चालते. परंतु करोनाच्या टाळेबंदीचा मोठा फटका पंढरपूरच्या अर्थकारणाला बसला आहे. आषाढी यात्रेत तर दहा लाखांपेक्षा अधिक भाविक तथा वारकऱ्यांचे पाय विठ्ठल दर्शनासाठी पंढरीकडे वळतात. यात्रेत हजारो कोटींची उलाढाल होते. आषाढी यात्रा भाविक आणि वारकऱ्यांविना साधेपणानेच पार पडली. यात शून्य अर्थकारण झाले. आता कार्तिकी यात्राही आषाढीप्रमाणेच साधेपणाने पार पडण्याची चिन्हे आहेत.

करोनाची साथ सुरू होण्यापूर्वी म्हणजे १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या मागील आर्थिक वर्षांत पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीला सुमारे ३७ कोटींचे उत्पन्न मिळाले होते. त्यात आषाढी यात्रेत चार कोटी ४० लाख, कार्तिक यात्रेत दोन कोटी ९६ लाख, चैत्र यात्रेत ७६ लाख ५० हजार आणि माघी यात्रेत दोन कोटी ९० लाख रुपये या उत्पन्नाचा समावेश होता. मागील वर्षांत १ मार्च २०१९ ते ३१ ऑक्टोबर २०१९ या कालावधीत मंदिर समितीला २७ कोटींचे उत्पन्न मिळाले होते. परंतु आता करोनाकाळात १ मार्च ते ३१ ऑक्टोबर २०२० या कालावधीत अवघे दोन कोटींचेच उत्पन्न मिळाले आहे. सुमारे २५ कोटींचे उत्पन्न बुडाले आहे. विठ्ठल मंदिर समितीला बसलेला हा आर्थिक फटका पाहता पंढरपूर शहरातील एकूणच आर्थिक उलाढाल किती वाईट आहे, याची कल्पना न केलेली बरी. कार्तिकी यात्रेत भरणारा जनावरांचा बाजारही यंदा बंद राहणार आहे.

पंढरपूरप्रमाणेच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अक्कलकोट नगरीची आर्थिक उलाढाल गेले सात-आठ महिने थांबली आहे. अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठय़ा संख्येने येतात. कोकण, मुंबई, ठाणे, पुणे, गुजरात आणि गोवा राज्यांतूनही भाविक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर येथील देवदर्शन आटोपून येतात आणि पुढे कर्नाटकातील गाणगापूरला जातात. एक-दोन दिवसांत सोलापूर जिल्हा आणि परिसरातील देवदर्शन घेण्यासाठी कुटुंबीयांसह भाविक नियोजन करून येतात. अक्कलकोटमध्ये वटवृक्ष श्री स्वामी देवस्थानासह लगतच्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात यात्रेकरूंच्या निवासाची मोठय़ा प्रमाणात सोय उपलब्ध आहे. दुसरीकडे करोनाशी मुकाबला करण्यासाठी वटवृक्ष श्री स्वामी देवस्थानासह अन्नछत्र मंडळाने आपापल्या परिसरात करोना उपचार केंद्र सुरू करण्यासह इतर सेवा बजावली आहे. प्रत्येकी ३५ ते ४० लाख रुपयांपर्यंत त्याचा सर्व आर्थिक भार उचलला आहे.

अक्कलकोटमधील थांबलेले अर्थकारण तेथील छोटे-मोठे व्यापारी आणि उद्योजकांसह सामान्य कष्टकरी वर्गाच्या दैनंदिन जीवनातील रणांगणावरची लढाई जीवघेणी ठरली आहे. या नगरीत सुमारे ७०० रिक्षाचालक असून त्यांचा उदरनिर्वाह स्थानिक नागरिकांपेक्षा परगावहून येणाऱ्या श्री स्वामी समर्थ भक्तांवर अवलंबून आहे. करोनामुळे रिक्षाचालकांना दररोज शंभर-दीडशे रुपयांची कमाई करणेही जिकिरीचे झाले आहे. करोनाचे संकट असतानाच त्यात अतिवृष्टी आणि पूरसंकटाने भर घातली आहे.

अक्कलकोटपासून पुढे कर्नाटकातील गाणगापूर येथे श्री दत्तात्रेय देवस्थान तेथील कर्नाटक सरकारने अलीकडे भाविकांसाठी खुले केले आहे. त्यामुळे गाणगापुरात दर्शनासाठी भाविकांची वर्दळ हळूहळू वाढू लागली आहे. गाणगापूरला जाताना किंवा तेथून परत येताना भाविक मंडळी अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कुलुपबंद मंदिराच्या प्रवेशद्वाराबाहेरच माथा टेकून दर्शन घेतात आणि निघून जातात. मंदिराचे दररोज बाहेरूनच दर्शन घेणाऱ्या परगावच्या भाविकांची संख्या किमान पाचशेपर्यंत आहे. तुळजापूरची अवस्था अशीच आहे. नुकताच नवरात्रोत्सव पार पडला. भाविकांविना तुळजापूरच्या मंदिर परिसरात नवरात्रोत्सव काळात शुकशुकाट होता.

अक्कलकोटचे सारे अर्थकारण मागील सात-आठ महिने जवळपास थांबले आहे. करोना आटोक्यात येत असल्यामुळे आता उशिरा का होईना, शासनाने देवस्थाने उघडण्यास परवानगी दिल्यास परिस्थिती हळूहळू निवळू लागेल आणि रुतून बसलेला अर्थगाडा पूर्ववत होण्यास मदत होईल. शासनाच्या निर्णयाची वाट पाहात आहोत.

-महेश इंगळे, अध्यक्ष, श्री वटवृक्ष स्वामी देवस्थान, अक्कलकोट

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने करोनाकाळात शासनाच्या निर्बंधामुळे महाप्रसाद व यात्रीनिवास सेवा बंद ठेवली तरी अन्य माध्यमातून गोरगरीब कुटुंबीयांच्या मदतीसाठी हातभार लावत आहोत. प्राप्त परिस्थितीत भाविकांनी अन्नछत्र मंडळाला पूर्वीप्रमाणेच सढळ हाताने मदत केल्यास अधिक व्यापक स्वरू पात सेवेचे उपक्रम राबविता येतील. त्यासाठी शासनाने प्रथम देवस्थाने खुली करणे गरजेचे आहे.

-जन्मेंजयराजे भोसले, संस्थापक-अध्यक्ष, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Due to the lockdown of temples the economic cycle was ruined abn

ताज्या बातम्या