मागील तीन-चार दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा  गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तहसील परिसर संपर्काच्या बाहेर झाला आहे. पावसामुळे भामरागडच्या बसस्थानक चौकापर्यंत पुराचे पाणी शिरले आहे. नदीच्या पुलावरून पाणी वाहात असल्याने रहदारी बंद झाली आहे. मुसळधार पावासामुळे गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास  १०० गावांचा संपर्क तुटला आहे.

दरवर्षी पावसाळ्यात भामरागड तालुक्याचा संपर्क तुटतो. यावर्षीही १५ ऑगस्ट रोजी, स्वातंत्र दिनी भामरागडचा जगाशी संपर्क तुटला आहे. सततच्या पावसामुळे पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने हा संपर्क तुटला आहे. या नदीच्या पुराचे पाणी भामरागड गावात शिरल्याने बाजारपेठ, बसस्थानक परिसरात पाणी आहे. काही लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

या पुरामुळे डॉ.प्रकाश व डॉ.मंदाकिनी आमटे यांच्या हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाचा देखील संपर्क देखील तुटला आहे. या भागात अनेक नाल्यांवरून पाणी वाहत आहे. त्यामुळे जवळपास १०० गावांचा संपर्क तुटला आहे. या भागातील मोठे गाव लाहेरीचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क नाही. त्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेष म्हणजे नुकतेच पर्लकोटा नदीवरील पुलासाठी ८० कोटींचा निधी या जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केला होता. हा उंच पूल झाला तरच या भागाला दरवर्षी भेडसावणारा हा प्रश्न कायम निकाली निघणार आहे.तेव्हा पुलाचे काम तात्काळ सुरू करा, अशी या भागातील नागरिकांची मागणी आहे.