सरकार पाडण्याच्या मुहूर्त सांगणाऱ्या नेत्यांनाही घरचा आहेर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीड : मी घरात बसले, म्हणून जे खूश आहेत त्यांनी माझा दौरा लिहून घ्यावा. दिल्लीपासून नाशिकपर्यंत आणि डिसेंबरमध्ये उसाच्या फडात जाऊन कामगारांशी संवाद साधणार आहे, असे सांगत हिंदी काव्याचा दाखला देत जगातील सर्व अन्याय सहन करण्याची ताकद आपल्यात असून मी सागरापेक्षा खोल आहे, मग मला कधीपर्यंत रोखणार, अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी विरोधकांना इशारा दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखांच्या संकल्पनेतील  योजना जनतेसाठी राबवाव्यात, असे आवाहन करून विरोधकांनी आता सरकार पाडण्याचे मुहूर्त जाहीर करण्याऐवजी विरोधकाच्या भूमिकेत काम करावे असा घरचा आहेरही भाजपच्या नेत्यांना दिला.

बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट (ता. पाटोदा) येथे शुक्रवारी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत दसरा मेळावा झाला. यावेळी माजी मंत्री महादेव जानकर, खासदार सुजय विखे, आमदार मोनिका राजळे, सुरेश धस, मेघना बोर्डीकर, नमिता मुंदडा, लक्ष्मण पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी पंकजा मुंडे यांनी देशात कुठेच होत नाही असा हा भक्ती आणि शक्तीचा रांगडा मेळावा असल्याचे सांगून हा कोणत्याही पक्षाचा किंवा कार्यकर्त्यांचा नाही तर राज्यभरातील वंचित आणि उपेक्षितांना ऊर्जा देणारा असल्याचे स्पष्ट केले.

मी काय बोलणार? याकडे सर्वाचे लक्ष असले तरी माझ्या मागे भगवानबाबांची मूर्ती, दिवंगत गोपीनाथ मुंडेंची कीर्ती आणि जनतेचे प्रेम असल्यामुळे मी कोणत्याही अपप्रवृत्तींचा आणि व्यक्तींचा उल्लेख करणार नाही. करोनामुळे मागील दोन वर्षांपासून मी घरातून काम करते, मात्र मी घरात बसले म्हणून जे खूश आहेत, त्यांनी माझा दौरा लिहून घ्यावा. १७ ऑक्टोबरपासून दिल्लीत नंतर नवी मुंबई, पुणे, नाशिक आणि त्यानंतर १२ डिसेंबरला उसाच्या फडात जाऊन कामगारांबरोबर संवाद साधणार आहे. जनतेच्या प्रेमाशिवाय आपल्याकडे काहीच नाही. जगात असलेले अन्याय सहन करण्याची ताकद असून मला कुठपर्यंत रोखाल अशा शब्दात त्यांनी एका हिंदी कवितेच्या माध्यमातून इशारा दिला.

मंत्रिपदाच्या कालावधीत ऊसतोडणी कामगार कल्याण महामंडळ वेळेत पूर्ण होऊ शकले नाही याबद्दल दिलगिरी व्यक्त करून ओबीसी आणि मराठा आरक्षणासाठी आता लढण्याची घोषणा केली. तीन पक्षाचे सरकार असल्यामुळे सर्वाना खूश करण्याच्या प्रयत्नात जनतेकडे दुर्लक्ष होत आहे, तर विरोधी पक्ष सरकार पाडण्याचे व सत्ताधारी टिकवण्याच्या मुहूर्तामध्ये अडकले आहेत. त्यामुळे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी आपापल्या भूमिकेत जाऊन जनतेसाठी काम करावे असे सांगत सरकार पाडण्याचे मुहूर्त सांगणाऱ्या भाजपच्या नेत्यांना घरचा आहेर दिला. तर माजी मंत्री महादेव जानकर म्हणाले की मंत्रिपद, आमदारकी-खासदारकी मिळेल, पण नेता मिळत नाही. सत्ता येते जाते, पण नेता कायम असतो. नेता विकत घेता येत नाही आणि बनवता येत नाही. अशा शब्दांत भाजपला अप्रत्यक्ष टोलाच लगावला.

दसरा मेळावा ही पंकजा मुंडेंची युक्ती आणि शक्तीचे प्रतीक आहे. सरकार कोणत्याही पक्षाचे असो ओबीसींच्या नेतृत्वाला पशुसंवर्धन खाते दिले जाते अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. ओबीसींच्या जनगणनेवर केंद्र आणि राज्य टोलवाटोलवी करत आहे. ओबीसींची जातनिहाय जनगणना करा असे ठराव न देणाऱ्या पक्षाला जागा दाखवण्याचा इशाराही जानकर यांनी दिला. खासदार डॉ. प्रीतम मुंडे यावेळी म्हणाल्या, की हा मेळावा कोणत्याही पक्षाचा नाही. राजकारणापलीकडच्या स्नेहाचा आहे. दिवंगत मुंडे यांनी आयुष्यभरात जमवलेली माणसे हीच आमची संपत्ती आहे. आपला आवाज आता मुंबई नाही तर दिल्लीपर्यंतही पोहोचतो असे सांगितले. गोपीनाथगडावरून भगवान भक्तिगडापर्यंत मोठी रॅली काढण्यात आली. राज्यभरातून मोठय़ा संख्येने लोक मेळाव्याला उपस्थित होते.

मंत्रिपद भाडय़ाने दिलंय..

करोनाच्या काळात नागरिकांची काय अवस्था होती. इंजेक्शनही मिळत नव्हतं. विकासासाठी पसा मिळत नाही, महिलांवरील अत्याचार वाढले. आम्ही प्रश्न विचारला की पालकमंत्र्यांना राग येतो. तुम्ही विरोधी पक्ष नेता असताना लोकांना त्रास देत थेट धमक्या देत होतात. आज जिल्ह्याची काय अवस्था आहे. त्यांनी आपले मंत्रिपद भाडय़ाने दिलंय. यांचंही काही चालत नाही अशी परिस्थिती आहे. अशा शब्दात पंकजा यांनी थेट नामोल्लेख न करता धनंजय मुंडेंवर निशाणा साधला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dussehra rally held in the presence pankaja munde and pritam munde zws
First published on: 16-10-2021 at 03:29 IST