dutta bharane emotional reaction on pune zp election result : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर केले जात आहेत. या निवडणुकीत पुणे जिल्हा परिषदेचाही समावेश होता. पुणे जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी जवळपास २९९ तर १३ पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी जवळपास ५२८ उमदेवार रिंगणात होते. त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार? कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? पुणे जिल्हा परिषदेत कोणत्या पक्षाची सत्ता येणार? याकडे पुणेकरांचं लक्ष लागलेलं होतं. अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर मतदान झालेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला भरघोस यश मिळाले आहे.
सुरूवातीच्या कलांमध्ये पुणे जिल्हा परिषदेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने एकहाती सत्ता मिळवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पुणे जिल्हा परिषदेत पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. पक्षाने ३९ पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवत ३७ चा बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची सत्ता स्थापन होणारे हे निश्चित झालो आहे. मात्र हा विजय पाहाण्यासाठी अजित पवार मात्र हयात नाहीत. याबद्दल राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून दुःख व्यक्त केले जात आहे.
इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार दत्ता भरणे यांनी पुणे जिल्हा परिषद निवडणूक विजयानंतर प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये त्यांनी हा विजय पाहण्यासाठी अजित पवार हवे होते अशी भावना व्यक्त केली आहे.
मी सर्व उमेदवारांचे अभिनंदन करतो. खरंतर हा आनंद पाहायला, उमेदवारांचा विजय पाहायला आमचे नेते अजितदादा पवार आज हवे होते. कारण जिल्ह्यामधील सर्व उमेदवाराची आखणी आणि सगळ्यांची उमेदवारी दादांनीच जाहीर केली होती. त्यांनीच चांगल्या प्रकारचे नियोजन केले होते. या यशामध्ये दादांचा सिंहाचा वाटा आहे. विजयी उमेदवारांचे अभिनंदन करतो. या विजयाच्या माध्यमातून अभिवादन करून दादांना विजयी उमेदवारांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो असे, दत्ता भरणे म्हणाले. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अनेक जण राष्ट्रवादी काँग्रेस सोडून इतर पक्षात देखील गेल्याचे पाहायला मिळाले. याबद्दल बोलताना भरणे म्हणाले की, जागा एकच असते पण इच्छुक खूप असतात आणि राष्ट्रवादी पक्षाकडे यावर्षी इच्छुकांची संख्या जास्त होती. त्यामुळे आमच्यातले काही उमेदवार भारतीय जनता पक्षाकडे गेले. त्याचा नाही म्हणलं तरी फटका बसला. आकडेवारी पाहिली तर ३-४ जागांचा फटका आम्हाला बसला आहे, असेही भरणे म्हणाले.
सुनील तटकरे काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी देखील एक्सवर एक पोस्ट केली आहे. “आज जाहीर झालेले जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल म्हणजे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री, आमचे नेते मा.श्री. अजितदादा पवार यांच्या कार्याला आणि त्यांच्या अविरत परिश्रमांना जनतेने कृतज्ञतापूर्वक अर्पण केलेली आदरांजली आहे. अजितदादांनी आयुष्यभर तळागाळातील माणसासाठी झटत विकासाला गती दिली. आजचा हा निकाल म्हणजे त्यांच्या विचारांवरील, त्यांच्या नेतृत्वावरील अढळ श्रद्धेची साक्ष आहे. या माध्यमातून दादांचा वारसा जपत अधिक जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे जनतेची सेवा करण्याचा आमचा संकल्प अधिक दृढ झाला आहे,” असे तटकरे म्हणाले आहेत.
