संगमनेर : मंत्री असलो, तरी आम्हीही शेतकऱ्यांचीच मुले आहोत. शेतकऱ्यांचे दुःख, त्यांच्या अडचणींची आम्हाला जाणीव आहे. मिळणाऱ्या उत्पन्नावर शेतकऱ्याची अनेक स्वप्न असतात, मात्र पाऊस नसल्याने ही स्वप्ने भंगली आहेत. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार कमी पडणार नसल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी केले.

तालुक्यातील पिंपळे या गावी आज, गुरुवारी दुपारी कृषिमंत्री भरणे यांनी शेतात जाऊन करपलेल्या पिकांची पाहणी केली. आमदार अमोल खताळ, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे, आत्माचे प्रकल्प संचालक प्रदीप लाटे, उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी, तहसीलदार धीरज मांजरे, महावितरणचे कार्यकारी अभियंता नारायण सोनवणे, तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या भेटी दरम्यान मंत्री भरणे म्हणाले की, राज्यात सध्या गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, पावसाअभावी शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. अशा संकटात शेतकऱ्यांना आधाराची गरज आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना कार्यालयात बोलावण्याऐवजी स्वतः त्यांच्या बांधावर जावे. गेल्या वर्षी अतिवृष्टीचा सामना करावा लागला आणि यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर व जास्तीत जास्त मदत कशी देता येईल, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. नैसर्गिक आपत्तीच्या निकषांनुसार काही बाबींसाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीची मदत घ्यावी लागते. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. चारा छावण्या सुरू करणे तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याबाबत शासन लक्ष ठेवून आहे.

अधिकाऱ्यांनी पीकविम्याचा आणि कर्जमाफी योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळवून द्यावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

दुष्काळाबाबत राजकारण नको

विरोधक टीका करतात, ते त्यांचे काम आहे. आम्ही आमचे काम करीत आहोत. शेतकरी संकटात असताना राजकारण करण्याची ही वेळ नाही. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. अशा वेळी शेतकऱ्याला मदत करणे, त्यांचे अश्रू पुसणे हे आमचे कर्तव्य आहे. यापूर्वीच्या सरकारांपेक्षाही अधिक मदत शेतकऱ्यांना देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे कृषिमंत्री भरणे म्हणाले.

शेतकऱ्यांना मदत द्या

संगमनेरच्या दुष्काळी परिस्थितीचा सर्वंकष आढावा घ्या. पावसाचे प्रमाण, पिकांचे नुकसान आणि शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन संपूर्ण तालुका दुष्काळी जाहीर करावा. शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी कृषिमंत्र्यांकडे केली.