मुंबई : स्थानिक प्रश्नांना बगल देण्याचे काँग्रेस पक्षाचे धोरण तसेच प्रादेशिक अस्मितेची धार यातून देशात प्रादेशिक पक्षांचा उदय झाला. प्रादेशिक पक्षांना यशही मिळत गेले. अशा या प्रादेशिक पक्षांमध्ये घराणेशाहीचीच पाळेमुळे रुजली. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे सूत्रे आल्याने आणखी एका प्रादेशिक पक्षात घराणेशाहीची पंरपरा कायम राहिली आहे.

काँग्रेसमध्ये घराणेशाहीची परंपरा मोठी आहे. पंडित नेहरू. इंदिरा गांधी, संजय गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी अशी मोठी यादी आहे. भाजपमध्ये राष्ट्रीय पातळीवर नेतृत्वात घराणेशाहीला अजून तरी तेवढा वाव मिळालेला नाही. नवे पक्षाध्यक्ष नितीन नबीन यांचे वडील बिहारममधील भाजप नेते असले तरी त्यांच्या पश्चात त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. भाजपच्या दुसर्‍या फळीत घराणेशाही आता उघडपणे दिसू लागली आहे.

राज्यातच प्रादेशिक पक्षांचा विचार केल्यास शिवसेनेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीतच पक्षाची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्याकडे गेली. शिवसेनेत आता उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे हे पिता-पुत्र पक्षात धोरणात्मक निर्णय घेतात. शिवसेना शिंदे गटात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर त्यांचे खासदार पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे हेच सारी जबाबदारी हाताळतात. मनसेत राज ठाकरे यांचे उत्तराधिकारी म्हणून पुत्र अमित ठाकरे पुढे येत आहेत.

शिंदे सेना अथवा मनसेच्या फलकांवर शिंदे व राज ठाकरे यांच्याबरोबरीने त्यांच्या मुलांची छायाचित्रे झळकतात. एकत्रित राष्ट्रवादीत शरद पवार यांचे पुतणे अजित पवार व कन्या सुप्रिया सुळे हेच पक्षाच्या कारभारात बारीक लक्ष घालत असत. पवारांनी सुप्रियाला राजकीय उत्तराधिकारी म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू केल्यानेच अजित पवार बिथरले होते. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत आता पत्नी सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झाली. पुत्र पार्थ व जय पवार कोणते पद भूषवितात का, याची उत्सुकता आहे. याशिवाय सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्याने रिक्त होणार्‍या राज्यसभेच्या जागेवर घराण्यातूनच कोणाला संधी देणार का, याचीही चर्चा सुरू झाली आहे.

द्रमुक अग्रक्रमावर

’ तमिळनाडूत द्रमुकमध्ये करुणानिधी यांची घराणेशाहीची मोठी परंपरा आहे. करुणानिधी यांचे पुत्र स्टॅलिन मुख्यमंत्रीपदी तर त्यांचे पुत्र उदयनिधी उपमुख्यमंत्रीपदी आहेत.  करुणानिधी यांची कन्या कानीमोझी या खासदार आहेत. 

’ बिहारमध्ये लालूप्रसाद यादव, राबडीदेवी, मुलगा तेजस्वी व तेज मुलगी मिसा अशी घराणेशाहीची परंपरा आहे.

’  कर्नाटकात माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या जनता दलात मुलगा कुमारस्वामी हे केंद्रात मंत्री व माजी मुख्यमंत्री, अन्य एक पुत्र रेवण्णा हे माजी मंत्री. नातू माजी खासदार, जावई खासदार, सून आमदार आहे.

’  समाजवादी पार्टीत मुलायमसिंह यादव यांचे पुत्र अखिलेश माजी मुख्यमंत्री, सून डिम्पल खासदार, एक भाऊ खासदार, दुसरा भाऊ माजी मंत्री अशी सारी धराणेशाही आहे.

नितीश कुमार यांचा अपवाद विविध प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी सूत्रे आपल्या घरात राहतील याची खबरदारी घेतली असताना बिहारमध्ये गेली २० वर्षे मुख्यमंत्रीपद भूषविणारे संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार यांनी आपल्या मुलाला राजकारणात अद्याप तरी सक्रिय केलेले नाही. बिहार निवडणुकीपूर्वी नितीश पुत्र सक्रिय होण्याची अटकळ बांधली जात होती. पण तसे काही झाले नाही.