अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते आज उपक्रमाचा आरंभ
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रामधील ४७ शाळा ‘ई-लनिर्ंग’ होणार आहेत. या उपक्रमाचे उद्घाटन उद्या २१ एप्रिलला राज्याचे वन, अर्थ व नियोजनमंत्री तसेच जिल्हय़ाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे.
वनांवरील ताण कमी करण्यासाठी स्थानिकांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देणे हे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेचे उद्दिष्ट आाहे. बफर विभागात ७९ गावांपैकी जन-वन विकास योजनेच्या माध्यमातून ५० गावांची निवड करण्यात आलेली आहे.
या गावांपैकी ४७ गावांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘ई-लर्निग’चे संच गावांतील शाळांमध्ये उपलब्ध झालेले आहेत. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प्रातील बफर क्षेत्रात एकूण ७९ गावांचा समावेश आहे. ही गावे दुर्गम भागात वसलेली आहेत. अशा भागातील आदिवासी मुलांना व मुलींना उच्चतम दर्जाच्या शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी, शहरी मुला-मुम्लींच्या बरोबरीने प्रगतीचे नवीन मार्ग खुले व्हावेत या दृष्टिकोनातून ई संचांचा पुरवठा करण्यात आलेला आहे.
मुधोली, भामडेळी व आगरझरी गावातील शाळेतील ई-लर्निग संचांचा उद्घाटन सोहळाही लवकरच पार पाडण्यात येईल. कार्यक्रमास मोठय़ा संख्येने नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पचे उपसंचालक गजेंद्र नरवणे यांनी केले आहे.

भामडेळी पर्यावरणपूरक शाळा
जिल्हा परिषदेची भामडेळी ही पर्यावरणपूरक शाळा आहे. शिक्षक विजय खनके व मुख्याध्यापिका मरकडेवार यांनी अथक परिश्रमातून शाळा पर्यावरणपूरक तयार केलेली आहे. या शाळेतही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ई-लर्निग संच लावण्यात येणार आहे. या सुविधेमुळे या शाळेतील विद्यार्थी आनंदीत आहेत.