सावंतवाडी – सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या उत्साहात मतदान प्रक्रिया सुरू असून, लोकशाहीच्या या उत्सवाला वेगळीच सकारात्मक ऊर्जा लाभत आहे. मतदान अधिक सुलभ, सुरक्षित व लोकाभिमुख व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक सुंदर नमुना म्हणजे कुडाळ तालुक्यातील पावशी येथील सखी मतदान केंद्र ठरले आहे.

हे मतदान केंद्र केवळ मतदानासाठीच नव्हे, तर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे प्रेरणास्थान ठरले आहे. “पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा… मतदान करा, लोकशाही बळकट करा” असा आशयपूर्ण संदेश या केंद्रावर ठळकपणे मांडण्यात आला.

नारळाच्या करवंट्या, माडाची झावळं आणि बांबूपासून साकारण्यात आलेला पर्यावरणपूरक सेल्फी पॉईंट हे या मतदान केंद्राचे मुख्य आकर्षण ठरले आहे. निसर्गाशी नाते जपणारी ही रचना मतदारांचे लक्ष वेधून घेत असून, मतदान केल्यानंतर मतदार आवर्जून या सेल्फी पॉईंटवर आपली छबी टिपत आहेत. विशेषतः तरुणांमध्ये या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, ज्येष्ठ नागरिकांनाही ही कल्पना भावून गेली आहे. लोकशाहीतील सहभाग आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश एकाच वेळी देणारे हे सखी मतदान केंद्र नागरिकांच्या मनात खोलवर ठसा उमटवत आहे.

पावशी येथील सखी मतदान केंद्राने मतदान म्हणजे केवळ अधिकार नाही, तर जबाबदारी आणि निसर्गाशी असलेले नातेही आहे, हे प्रभावीपणे अधोरेखित केले असून, लोकशाहीच्या उत्सवाला पर्यावरणपूरक स्पर्श देत जिल्ह्यासाठी एक आदर्श उदाहरण निर्माण केले आहे.