करोनामुळे कुंभारांचे आर्थिक गणित अडचणीत

करोनाकाळात सर्वच बंद असल्याने कुंभारकाम करणाऱ्यांच्या पुढील वर्षभराच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही उभा राहिला आहे.

संग्रहित छायाचित्र

कल्पेश भोईर

आठवडा बाजार टाळेबंदीत असल्याने नुकसान; लग्नसमारंभ रद्द झाल्याने आर्थिक फटका

टाळेबंदीचा कालावधी वाढल्याने सर्वच ठिकाणच्या बाजारपेठा ठप्प आहेत, त्यामुळे ऐन हंगामात कुंभारवाडय़ांवर आर्थिक चिंतेचे सावट आहे. उन्हाळ्यातील अक्षयतृतीया, लग्नसराई काळात गाडगी, मडकी, रांजण आदींना मोठी मागणी असते. करोनाकाळात सर्वच बंद असल्याने कुंभारकाम करणाऱ्यांच्या पुढील वर्षभराच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही उभा राहिला आहे.

तालुक्यातील ग्रामीण भागात कुंभार मडकी तयार करण्याचा पारंपरिक व्यवसाय करतात. यामध्ये गाडगी, मडकी, रांजण, सणासुदीला लागणाऱ्या विविध प्रकारच्या मातीच्या वस्तू आदी तयार करून त्यावरच आपला उदरनिर्वाह चालवतात. परंतु यंदाच्या वर्षी माठ विक्रीच्या ऐन हंगामातच करोनासारख्या महाभयंकर विषाणूने डोके वर काढल्याने सर्वत्र टाळेबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे तयार केलेली मडकी व इतर मातीच्या वस्तू बाजारात विक्रीसाठी पोहचू न शकल्याने सर्वच माल पडून असल्याचे कुंभारांनी सांगितले आहे.

उन्हाळ्यामध्ये थंड पाणी पिण्यासाठी माठाला मोठय़ा प्रमाणात मागणी असते. त्यामुळे दिवाळीपासूनच मडकी तयार करण्याच्या कामाला सुरुवात केली जाते.

विशेष करून मार्च ते मे या तीन महिन्यांत अधिक प्रमाणात माठ व इतर मातीच्या वस्तूंची विक्री केली जाते. हा काळ या व्यावसायिकांचा चार पैसे मिळविण्यासाठीचा मत्त्वाचा काळ असतो. यावरच वर्षभर त्यांच्या कुटुंबाचा संसाराचा गाडा सुरू असतो, परंतु करोनाच्या संकटाने कुंभारांनी मेहनतीने तयार केलेल्या विविध हजारो रुपये किमतीच्या वस्तूंवर पाणी सोडावे लागले आहे.

हंगाम सुरू होताच दिवसाला एक कारागीर साधारण ५० ते ६० छोटी किंवा १५ मोठी मडकी तयार करतो.त्यामुळे साधारणपणे दिवसाला १ ते २ हजार रुपयांचे काम पूर्ण करतो. मात्र यावर्षीची सगळीच मेहनत वाया गेली असल्याचे कुंभार व्यावसायिकांनी सांगितले.

लग्नसराईचाही फटका

लग्न समारंभासाठी रंगीबेरंगी कलश (आयरी) यांना मोठी मागणी असते, परंतु करोनामुळे लग्नसमारंभच रद्द झाले आहेत. त्यामुळे शुभकार्यासाठी लागणारे रंगीबेरंगी कलशांच्या मागण्या रद्द झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. एक कलशांचा सेट साधारणपणे दोन ते अडीच हजारांना विकला जातो, यामुळे यातूनही चांगले उत्पन्न मिळते. आता तयार केलेले कलश तसेच राहिल्याने हे कलश वर्षभर सांभाळून ठेवावे लागणार आहेत. यासाठी लागणारी जागा व इतर साऱ्याच अडचणी निर्माण झाल्या असल्याचे कुंभार व्यावसायिक चंदन रसाळकर यांनी सांगितले आहे.

करोनामुळे आठवडा बाजार बंद आहेत त्यामुळे तयार केलेली गाडगी, मडकी, रांजण बाजारात विक्रीसाठी गेली नसल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे  पुढील काळ  आमच्यासाठी कठीण आहे.

– विनायक अचोळकर, कुंभार व्यावसायिक, वसई

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Economic math of potters is in trouble because of the corona abn

ताज्या बातम्या