scorecardresearch

हसन मुश्रीफ यांच्या घरावर तब्बल १२ तास छापेमारी! चौकशीत ईडीच्या हाती नेमकं काय लागलं?

सकाळी ७ वाजेपासून सुरू झालेली ही छापेमारी तब्बल १२ तासांनी संपली आहे.

हसन मुश्रीफ यांच्या घरावर तब्बल १२ तास छापेमारी! चौकशीत ईडीच्या हाती नेमकं काय लागलं?
ईडीची ही कारवाई राजकीय हेतू समोर ठेवून करण्यात आल्याचा आरोपही हसन मुश्रीफ यांनी केला.

NCP Hasan Mushrif ED Raid : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज सकाळी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरांवर छापेमार केली. सकाळी ७ वाजेपासून सुरू झालेली ही छापेमारी तब्बल १२ तासांनी संपली आहे. संध्याकाळी साधारण ७ वाजता ईडीचे अधिकारी मुश्रीफ यांच्या घरातून बाहेर निघाले आहेत. मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घरांवर ही कारवाई करण्यात आली. ईडीच्या या छापेमारीबाबत मुश्रीफ यांचे पुत्र नावीद मुश्रीफ यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

चौकशी शांततेत पार पडली

“आम्ही ईडीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीला सहकार्य केले आहे. त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची आम्ही उत्तरं दिली आहेत. आमच्या घरासमोर जे लोक उभे होते, त्यांचे मी आभार मानतो. चौकशी शांततेत पार पडलेली आहे. ही धाड राजकीय हेतूने झालेली आहे,” असे नावीद यांनी सांगितले.

आणखी वाचा – ईडीने छापेमारी केलेल्या हसन मुश्रीफ यांची एकूण संपत्ती माहीत आहे का?

काय म्हणाले हसन मुश्रीफ?

दरम्यान, ईडीच्या कारवाईदरम्यान हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली होती. “माझ्या आणि माझ्या मुलीच्या घरावर ईडीने छापे टाकल्याची माहिती मला मिळाली आहे. मी कामानिमित्त बाहेगावी असल्याने दुरध्वनीवरून मला ही माहिती मिळाली. माझा कारखाना, नातेवाईकांची घरं तपासण्याचे काम सुरू आहे,” असे मुश्रीफ म्हणाले. तसेच “माझ्यावरील ईडीच्या या कारवाईविरोधात कागल बंदची घोषणा कार्यकर्त्यांनी दिली असल्याचेही मला समजलं आहे. त्यामुळे माझी कार्यकर्त्यांनी विनंती आहे, की त्यांनी हा बंद मागे घ्यावा आणि शांतात राखावी, अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली. तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे कोणतेही वर्तन कार्यकर्त्यांनी करू”, असे आवाहनही त्यांनी केले होते.

आणखी वाचा – ईडीच्या छापेमारीनंतर हसन मुश्रीफ यांचे पुत्र आक्रमक, म्हणाले “…तोपर्यंत कोणी केसालाही धक्का लावू शकणार नाही”

विशिष्ट धर्माच्या लोकांना लक्ष्य केलं जातंय – हसन मुश्रीफ

ही कारवाई राजकीय हेतू समोर ठेवून करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच विशिष्ट धर्माच्या लोकांना लक्ष्य केले जात आहे, असेही मुश्रीफ म्हणाले. “चार दिवसांपूर्वी कागलमधील भाजपाचे नेते दिल्लीत जाऊन आले. माझ्यावर कारवाई करावी, असे प्रयत्न त्यांनी केले. एकंदरीतच हे गलिच्छ राजकारण आहे. राजकारणात अशा प्रकारे कारवाया होत असतील तर याचा निषेधच झाला पाहिजे. नवाब मलिक झाले, आता माझ्यावर कारवाई सुरू आहे. किरीट सोमय्या म्हणतात अस्लम शेख यांच्यावरही कारवाई होईल, याचा अर्थ विशिष्ट धर्माच्या लोकांना लक्ष्य केलं जात आहे”, असा आरोपही मुश्रीफ यांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-01-2023 at 19:39 IST

संबंधित बातम्या