ED Raids Anil Deshmukh : अनिल देशमुखांवर नक्की कोणते आरोप आहेत?

ईडीने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील नागपूरमधील निवासस्थानी तसंच त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरांवर छापे टाकलेत. देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता

ED Raids Anil Deshmukh Nagpur Residence
सक्तवसुली संचालनायलयाने शुक्रवारी सकाळी छापा टाकला. (फोटो पीटीआय आणि ट्विटरवरुन साभार)

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील निवासस्थानी सक्तवसुली संचालनायलयाने (ईडी) शुक्रवारी (२५ जून २०२१ रोजी) सकाळी छापा टाकला आहे. ईडीने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील निवासस्थानी तसंच त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरांवर छापे टाकलेत. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. पण अनिल देशमुख यांच्यावर नक्की काय आरोप आहेत ज्यासंदर्भात ही कारवाई करण्यात आलीय जाणून घेऊयात…

देशमुख यांनी महिना १०० कोटी रुपयांचा हप्ता किंवा खंडणी गोळा करण्याची सूचना निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंसह अन्य अधिकाऱ्यांना दिली होती. तसेच पोलीस अधिकाऱ्यांची बदली प्रक्रिया, नियमित कामकाजातही देशमुख यांचा हस्तक्षेप वाढला होता, असे आरोप करणारे पत्र मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मे महिन्याच्या सुरुवातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते.

सीबीआयच्या अहवालामध्ये काय आहे?

तसेच या तक्रारीची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात केली होती. त्यावरील सुनावणीत उच्च न्यायालयाने सीबीआयला प्राथमिक चौकशी करून दोन आठवड्यांत अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता. सीबीआयच्या पथकाने प्राथमिक चौकशी अहवाल दिल्ली येथील मुख्यालयास पाठवला. त्यात देशमुख यांनी पद, अधिकारांचा गैरवापर केला, अप्रामाणिकपणे कर्तव्य बजावत गैरफायदा घेतला, असे निरीक्षण नमूद होते. देशमुख यांची कृती दखलपात्र गुन्हा नोंद होण्यास पात्र ठरते, असे निरीक्षण त्यात नमूद होते. त्याआधारे सीबीआयने देशमुख यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील कलमांनुसार गुन्हा नोंदवला.

संपत्ती होऊ शकते जप्त

सीबीआयने केलेल्या प्राथमिक चौकशीतील निष्कर्ष, प्रथम खबरी अहवालाआधारे (एफआयआर) ईडीने देशमुख यांच्याविरोधात ईसीआयआर (एन्फोर्समेन्ट केस इन्फॉर्मेशन रिपोर्ट) नोंदवत मे महिन्याच्या मध्यावर्तीपासून तपास सुरू केला. सिंह यांच्यासह उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केलेल्या वाझे यांनीही देशमुख यांच्यावर आरोप केले. या आरोपांतील तथ्य पडताळण्यासाठी देशमुख आणि संबंधितांचे आर्थिक व्यवहार ईडी तपासत आहे. तपासादरम्यान आरोपात तथ्य आढळले तर त्यांची, संबंधितांची मालमत्ता जप्त होऊ शकेल, असे ईडीतील सूत्रांनी मे महिन्यामध्ये तपास सुरु झाल्यानंतर सांगितलं होतं. मे महिन्यामध्येही एकदा देशमुख यांच्या घरावर ईडीने छापा टाकला होता.

काँग्रेस राष्ट्रवादीने तपास सुरु झाल्यानंतर दिलेली प्रतिक्रिया…

अनिल देशमुख यांच्याविरोधात सक्तीवसुली संचालनालयाने (ईडी) दाखल के लेला गुन्हा म्हणजे सत्तेचा गैरवापर करुन राज्यातील आघाडी सरकारला बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी ईडीने तसाप सुरु केल्यानंतर केला होता.  देशमुख यांच्यावरील कारवाई म्हणजे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सुरू केलेल्या राजकीय छळाचा एक भाग आहे, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ed raids anil deshmukh nagpur residence know full details of case scsg