शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) आज ईडी (ED) चौकशीसाठी हजर राहण्याची शक्यता आहे. पत्राचाळ घोटाळाप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांना ईडीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आला होता. मात्र, राज्यात चाललेल्या सत्तापालटाच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी ईडीकडे वेळ मागितला होता. संजय राऊत यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे.

संजय राऊत यांनी ट्वीट केलंय की, “मी आज दुपारी १२ वाजता ईडीसमोर हजर होणार आहे. मला बजावलेल्या समन्सचा मी आदर करतो. तपास यंत्रणांना सहकार्य करणं हे माझे कर्तव्य आहे. शिवसेना कार्यकर्त्यांना ईडी कार्यालयात जमू नये, असं आवाहन राऊत यांनी केलं आहे.

राजकीय नेत्यांची ईडीकडून चौकशी
एकीकडे राज्यात उलथापालथ सुरु असताना दुसरीकडे राजकीय नेत्यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. २८ जूनला संजय राऊत यांना ईडकडून चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. मात्र, राऊत यांनी १४ दिवसांची मुदतवाढ मागितली होती. ईडीने राऊतांची विनंती मान्य करत त्यांना १४ दिवसांची मुदतवाढ दिली होती.

काय आहे घोटाळा?
मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि म्हाडाचा भूखंड आहे. ही चाळ विकसित करण्याचे काम प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते. परंतु त्यांनी या चाळीचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला असल्याचा आरोप ईडीने केला आहे. पत्राचाळीत राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप प्रवीण राऊत यांच्यावर करण्यात आला आहे. प्रवीण राऊत यांच्या कंपनीला पत्रा चाळीतील ३ हजार फ्लॅटचे काम देण्यात आले होते. त्यापैकी ६७२ फ्लॅट भाडेकरांसाठी राखीव ठेवण्यात आले होते तर बाकीचे म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घेण्यात येणार होते. मात्र, २०११ ते २०१३ सालांमध्ये प्रवीण राऊत यांनी चाळीचे अनेक भाग खासगी बिल्डर्सना विकल्याचा आरोप करण्यात आला आहे.