Kolhapuri chappals vs Prada : कोल्हापुरी चप्पल मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरी चप्पल हा जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. या चर्चेचे कारण म्हणजे इटलीत पार पडलेल्या एका फॅशन शोमध्ये एका कंपनीने हुबेहूब कोल्हापुरीसारखी दिसणारी चप्पल प्राडाच्या मेन्स कलेक्शनच्या नावाखाली विकत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे या कंपनीवर कोल्हापुरी चप्पलचा ब्रँड कॉपी केल्याचा आरोप केला जात आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे कोल्हापुरी चप्पलची किंमत ५०० रुपयांच्या आसपास असते. पण ही कंपनी हुबेहूब असलेली कोल्हापुरी चप्पल तब्बल एक लाख रुपयांना विकत असल्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.

प्राडा नावाच्या या कंपनीवर महाराष्ट्रातील काही कारागीरांनीही नाराजी व्यक्त केली आहे. तसेच अनेकांनी यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आता या वादावर एडलवीस म्युच्युअल फंडाच्या सीईओ राधिका गुप्ता यांनीही उडी घेतली आहे. राधिका गुप्ता या ‘प्रादा’वर चांगल्याच भडकल्या आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबाबत त्यांनी एक पोस्ट केली असून त्यामध्ये म्हटलं की, “५०० रुपयांची कोल्हापुरी चप्पल १ लाखात विकली गेली आणि ते ही क्रेडिट न देता”, असं राधिका गुप्ता यांनी म्हटलं आहे.

राधिका गुप्ता नेमकी काय म्हणाल्या?

“५०० रुपयांची कोल्हापुरी चप्पल १ लाखात विकली गेली आणि ते ही क्रेडिट न देता, म्हणूनच मला हथकरघा (हाताने विणलेले)घालण्याची आणि त्याबद्दल बोलण्याची खूप आवड आहे. प्रत्येक मुलाला प्रादा आणि गुच्ची कोण आहेत हे माहित आहे. पण फार कमी लोकांना हिमरू, संबलपुरी किंवा नारायणपेट बद्दल माहिती आहे. आपला कापडाचा वारसा आणि कारागिरी जपणं ही आपलीच जबाबदारी आहे, ती आपणच जपली पाहिजे आणि ब्रँड केली पाहिजे, त्याचा फायदा घेतला पाहिजे”, असं राधिका गुप्ता यांनी म्हटलं. दरम्यान, पोस्टच्या शेवटी राधिका गुप्ता यांनी असंही म्हटलं की, “प्राडाच्या बाबतीत…लक्षात ठेवा की जोपर्यंत सिंह लिहायला शिकत नाही, तोपर्यंत सर्व कथा नेहमीच शिकारीचे गौरव करतील.”

कोल्हापुरी चप्पलवरून सुरू झालेला वाद काय आहे?

इटालियन लग्झुरी फॅशन ब्रँड प्रादाकडून कोल्हापुरी चप्पलसारखे दिसणारे सँडल सादर करण्यात आले. ते कोल्हापुरी असतानाही त्याचा नामोल्लेख न केल्याने भारतीय फॅशन वर्तुळात आणि महाराष्ट्रातील पारंपरिक कारागिरांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यांनी कोल्हापुरी चपलेचा समावेश भौगोलिक उपदर्शमध्ये (जीआय) असल्याचे पुरावेच मांडायला सुरुवात केली. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चरने रीतसर तक्रार केली. त्यानंतर प्रादा ग्रुपचे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचे प्रमुख लोरेन्झो बर्टेली यांनी संबंधित सँडलची भारतीय प्रेरणा असल्याचे नमूद केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सांस्कृतिक मान्यता आणि स्थानिक कारागिरांशी सहकार्य करण्याची वचनबद्धता पत्राद्वारे व्यक्त केली. पण हे करताना त्यांनी कोठेही ‘कोल्हापुरी चप्पल’ असा उल्लेख मात्र केलेला नाही. यानंतर चेंबर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी ‘कोल्हापुरी चपलांना भारत सरकारने जीआय मानांकन दिले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ते पुरेसे नाही. आपल्याला या चप्पल उत्पादनांचे पेटंट घेण्याची आवश्यकता आहे. कोल्हापुरी चप्पलच नाही तर कोल्हापूरच्या गुळाचेही पेटंट घेऊ,’ असे म्हटले आहे. तर माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही कोल्हापुरी चपलेबाबत केवळ भावनिक न होता त्याचे पेटंट मिळवणे अत्यावश्यक असल्याचे कोल्हापुरात नमूद केले.