खाद्यतेल पुन्हा भडकले

आयातीवर करोनामुळे परिणाम; सोयाबीन १० हजार रुपये क्विंटल 

आयातीवर करोनामुळे परिणाम; सोयाबीन १० हजार रुपये क्विंटल 

प्रदीप नणंदकर, लोकसत्ता
लातूर : सोयाबीनने उच्चांकी भावाचा टप्पा गाठला असून मंगळवारी लातूरच्या कीर्ती गोल्डचा भाव १० हजार रुपये क्विंटल असा होता. गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात तीन हजार ९०० रुपये सोयाबीनचा भाव होता. तो आठ हजारांपर्यंत पोहोचून पुन्हा कमी झाला होता. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हवामान बदलामुळे सोयाबीन उत्पादनात घट होण्याचे व तीच स्थिती देशांतर्गतही असल्याने सोयाबीनला उच्चांकी भाव मिळतो आहे.

या वर्षी मध्य प्रदेशात पाऊस नाही. तीच स्थिती राजस्थानची. महाराष्ट्रात कुठे अतिवृष्टी तर कुठे सुमार पाऊस. त्यामुळे पेरणी उशिरा झाली. गुणवत्तेचे बियाणे मिळाले नाही त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत देशभरात सुमारे २० लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा कमी झाला आहे.

सोयाबीनच्या भावामुळे पेरणीचे क्षेत्र वाढेल ही अपेक्षा होती. मात्र, घडले उलटेच. या सर्वाचा परिणाम सोयाबीनचा भाव वाढण्यात झाला आहे. वायदे बाजारात कृत्रिमरीत्या भाव वाढवले जात असल्याबद्दल सोयाबीन प्रक्रिया संघटनेचे अध्यक्ष देवीश जैन यांनी यासंबंधी सेबीलाच पत्र लिहिले आहे. १५ जुलै रोजी वायदे बाजारात सोयाबीनचा भाव सात हजार ४७८ रुपये क्विंटल होता. २७ जुलै रोजी तो नऊ (पान २ वर) (पान १ वरून) हजार ४५० एवढा विक्रमी वाढला आहे. ही वाढ कृत्रिम आहे. प्रत्यक्ष माल खरेदी करणाऱ्यास २५ ते ३० टक्के स्वत:चे भांडवल गुंतवल्यानंतर ७० टक्के कर्ज घेता येते. मालाची थेट खरेदी-विक्री त्याला करावी लागते. वायदे बाजारात केवळ आठ ते दहा टक्के गुंतवणुकीत १०० टक्के माल खरेदी करता येते. मालाची थेट खरेदी-विक्री करण्याची गरज नाही. बहुतांश व्यवहार, ‘लिया ना दिया’ असाच असतो. कमी गुंतवणुकीत अधिक नफ्याचा धंदा करता येत असल्याने कृत्रिम टंचाई निर्माण करून व भीतीचे वातावरण तयार करण्याचा खेळ खेळला जातो.

‘मुलांचा खेळ होतो, पण बेडकांचा जीव जातो’ त्याप्रमाणे शेतकऱ्याच्या जिवाशी खेळले जात आहे. सरकारने या सर्व प्रकारात डोळ्यात तेल घालून सजग राहायला हवे तर दलालच शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करत असल्याचे चित्र आहे.

दरस्थिती..   २८ जून रोजी सोयाबीन तेलाचा भाव १२५ रुपये किलो होता, तो आता १६५, शेंगदाणा १६० वरून २१०, सूर्यफूल १६० वरून १८०, करडी २१० वरून २३० तर पामतेल १३० वरून १४५ रुपये किलो झाले आहे. पशुखाद्याचा भाव ६५ हजार टनांवरून ९० हजार टनावर पोहोचला आहे.

कारण काय?

या वर्षी अमेरिका, ब्राझील, कॅनडा, अर्जेटिना या प्रमुख सोयाबीन उत्पादक देशात सध्या दुष्काळी स्थिती आहे. त्याचा फटका उत्पादनाला बसणार आहे. पामतेल उत्पादक मलेशिया, इंडोनेशिया या देशात करोनाची साथ टिपेला पोहोचल्यामुळे टाळेबंदी लागू झाली असून कामगार कामावर येत नसल्याने उत्पादन घटले आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Edible oil prices rise due to imports hit by corona zws

ताज्या बातम्या