राज ठाकरे यांच्या दिवाळखोरीत निघालेल्या कंपनीला ईडीने नोटीस बजावली असून हा प्रकार म्हणजे राजकीय खेळीच असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी बुधवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केला. राज ठाकरे यांच्या सभांना मिळालेला प्रतिसाद पाहूनच हे सूडबुध्दीचे राजकारण चालले असल्याचा आरोपही त्यांनी केला.

ठाकरे यांच्या आंदोलनामुळे भाजपला असुरक्षित वाटू लागले आहे. ठाकरे यांची कंपनी दिवाळखोरीत असून हा व्यवहार जुना असून यानंतर तीन सरकारे येऊन गेली. मग आताच ईडीला नोटीस पाठविण्याची गरज का भासली असा सवाल त्यांनी केला.

महापूर ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी आणि पूरग्रस्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरी २ लाखाची मदत मिळावी यासह विविध मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार असल्याचे सांगून शेट्टी म्हणाले की,  पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी ३१ ऑगस्ट रोजी सांगलीत मोर्चा काढण्यात येणार आहे. पूरग्रस्त भागातील शेतीची कामे रोजगार हमी योजनेतून करायला परवानगी मिळावी, घरबांधणीसाठी ५ लाख रुपये मिळावेत,वीज पंपाचे बिल माफ करावे, दुधाळ जनावरांसाठी ५० हजार नुकसान भरपाई मिळावी, विजेची दुरूस्ती तातडीने करून वीज पुरवठा सुरू करावा, शहरी भागातील पूरग्रस्त भागातील एक वर्षांची घरपट्टी, पाणी पट्टी माफ करावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन होणार आहे.

शेट्टी यांनी सांगितले की, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील महापुराला केंद्र सरकारचा नाकर्तेपणा जबाबदार असून या काळामध्ये आणि दोन्ही राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव होता, यामुळे  लोकांना याचा फटका बसला आहे. सांगलीतील पूरस्थितीला नियंत्रणामध्ये राखण्यात पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी अयशस्वी ठरले असून परिस्थिती हाताबाहेर जाईपर्यंत त्यांनी का पावले उचलली नाहीत असा आमचा प्रश्न आहे. महापूर प्रश्नी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.