सोलापूर : एका शिक्षण संस्थाचालकाकडून २५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडून पकडले गेलेले सोलापूर जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना विशेष न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, कोल्हापूर व सोलापुरातील त्यांच्या निवासस्थानाची झाडाझडती घेण्यात आली असून यात काही आक्षेपार्ह बाबी समोर आल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सूत्रांनी सांगितले. पुढील चौकशीसाठी लोहार यांना कोल्हापूरला नेण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

जागतिक शिक्षक पुरस्काराचे मानकरी रणजितसिंह डिसले यांना अमेरिकेत फुलब्राईट अभ्यासवृत्तीसाठी प्रदीर्घ रजा मंजूर करताना शिक्षणाधिकारी लोहार यांनी अनेक गंभीर आक्षेप घेतले होते. त्यामुळे डिसले यांनीही शिक्षण विभागाकडून आपला मानसिक व शारीरिक छळ होत असल्याचा आरोप करून शिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. नंतर हे प्रकरण थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचले असता डिसले यांना दिलासा मिळाला होता. या संपूर्ण प्रकरणात शिक्षणाधिकारी लोहार हे केंद्रस्थानी होते.

Give time to employees to drink water every 20 minutes health department advises companies
दर २० मिनिटांनी पाणी पिण्यासाठी कर्मचाऱ्यांना वेळ द्या, आरोग्य विभागाकडून कंपन्यांना सूचना
haryana school bus accident
हरियाणातील स्कूलबस अपघात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; शाळेच्या मुख्यध्यापिकेसह तिघांना अटक
nashik, malegaon, clerk arrested, ration office, Accepting Bribe, Register Needy Families, Welfare Schemes, malegaon bribe case,
नाशिक : लाच स्वीकारताना कारकुनास अटक
Byju employees lost their jobs
नोटीस पीरियड नाही, पगारही नाही; फक्त एक फोन कॉल अन् बायजूच्या कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली

उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी येथील एका शिक्षण संस्थाचालकाने त्याच्या माध्यमिक शाळेत आठवी ते दहावीपर्यंत वर्ग वाढ होण्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल केला होता. युडायस प्लस नावाच्या ऑनलाइन प्रणालीमध्ये दाखल झालेल्या अर्जानुसार काम होण्यासाठी संबंधित शिक्षण संस्थाचालक पाठपुरावा करीत होते. या कामाचा प्रस्ताव सही करून मंजुरीसाठी पुण्याच्या शिक्षण उपसंचालकाकडे पाठविण्याकरिता शिक्षणाधिकारी लोहार यांनी ५० हजार रुपयांची लाच मागितली. नंतर तडजोडीत २५ हजारांची लाच देण्याचे ठरले. दरम्यान, संबंधित शिक्षण संस्थाचालकाने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोलापूर कार्यालयात तक्रार नोंदविली. त्यानुसार पडताळणी होऊन जिल्हा परिषादेत प्राथमिक विभाग शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या दालनाबाहेर सापळा लावण्यात आला असता त्यात लोहार हे प्रत्यक्ष लाच घेताना रंगेहाथ सापडले. सहायक पोलीस आयुक्त संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक व चंद्रकांत कोळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

यापूर्वीही वादग्रस्त

लोहार हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडीचे राहणारे असून शिक्षण विभागातील आतापर्यंतच्या सेवेत ते नेहमीच वादग्रस्त राहिले आहेत. यापूर्वी कोल्हापूर जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षणाधिकारी असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप जिल्हा परिषदेच्या सभागृहात झाला होता. त्यासाठी सभागृहाने त्यांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचा ठराव मंजूर केला होता. मात्र त्याविरोधात लोहार यांनी प्रशासकीय न्यायाधीकरणात दाद मागितली होती. लोहार यांना पुण्यातील कॉमनवेल्थ व्होकेशनल ऑफ टाँगो या संस्थेने मानद डॉक्टरेटची पदवी बहाल केली असता या विद्यापीठाच्या अधिकृतपणाविषयी आक्षेप घेण्यात आला होता. तेव्हा टाँगो देशानेही त्यांच्याकडे अशा नावाचे कोणतेही विद्यापीठ नसल्याचा निर्वाळा दिला होता. त्यामुळे शेवटी पुण्याच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयाने पुण्यात वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. या पार्श्वभूमीवर किरण लोहार यांच्या लाचखोरी वृत्तीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाईचा हातोडा मारला आहे. शालेय शिक्षण विभागाकडून लोहार यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होण्याची माहिती समोर आली आहे.