Bakri Eid Qurbani Rules in Housing Society: बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील काही गृहसंकुलात कुर्बानी देण्यावरून वाद उद्भवले आहेत. मीरा रोडमधील पूनम क्लस्टर या उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या गृहसंकुलात बकरी ईदच्या आदल्या दिवशी बकरे आणण्यात आले होते. या मुद्द्यावरून संबंधित रहिवासी आणि सोसायटी पदाधिकाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला. हे प्रकरण बाहेर आल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी या वादात उडी घेत तिथे डुक्कर नेत आंदोलन केले. त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला होता. पण मुंबई किंवा इतर ठिकाणी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये अशाप्रकारे पशूहत्या, कुर्बानी देता येते का? याबद्दल कायदा काय सांगतो? याबद्दल जाणून घेऊ.
दरवर्षी बकरी ईदच्या निमित्ताने सोसायटीमध्ये कुर्बानी देण्याचा विषय समोर येतो. कायदेशीररित्या पशूहत्या कुठे करता येते? गृहसंकुलात अशा कुर्बानीला परवानगी देता येऊ शकते का? धार्मिक पशूहत्या कुठे करता येतात? याबाबत द इंडियन एक्सप्रेसने सविस्तर वृत्त दिले आहे.
मुंबई महानगरपालिकेचे धोरण काय?
मुंबई महानगरपालिकेच्या नियमानुसार, बकरी ईदच्या निमित्ताने कुठेही पशूहत्या करता येत नाही. यासाठी पालिकेची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असते. बकरी ईदच्या आधी दरवर्षी मुंबई मनपाकडून काही परिसर अधिसूचित करण्यात येतात, जिथे कायदेशीररित्या कुर्बानी देता येते. त्यातही स्वच्छता, कचऱ्याची विल्हेवाट आणि सार्वजनिक सुरक्षेशी संबंधित अटी घालूनच अशी परवानगी दिली जाते.
देवनार कत्तलखाना, परवानाधारक मांस बाजार, अधिसूचित सार्वजनिक कत्तलखाने अशा निवडक ठिकाणी कुर्बानी देण्याची परवानगी दिली जाते. काही प्रकरणात खासगी जागा किंवा गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये महानगरपालिकेने मंजूरी दिली असेल तरच कुर्बानी देता येते.

मुंबई महानगरपालिकेच्या मायबीएमसी या ॲपवर जाऊन खासगी जागेवर बकरी ईदनिमित्त तात्पुरती परवानगी मागण्यासाठी अर्ज केला जाऊ शकतो. यासाठी अर्जदारांना प्रस्तावित जागेचा तपशील सादर करावा लागतो. तसेच घालून दिलेल्या अटींचे पालन करणे आवश्यक असते. जवळपास अधिकृत कत्तलखाना अस्तित्वात आहे की नाही, हे तपासून आणि स्वच्छता, बंदिस्त जागेची उपलब्धता पाहून परवानगी दिली जाऊ शकते.
मुंबई मनपाने यंदा किती अधिकृत ठिकाणे निश्चित केली?
यावर्षी बकरी ईदनिमित्त मुंबईतील १०९ ठिकाणी पशुहत्येला परवानगी देण्यात आल्याचे मुंबई मनपाने म्हटले आहे. यामध्ये पालिकेच्या विविध प्रभागांमध्ये असलेल्या अधिकृत सामुदायिक कत्तलखान्यांचा आणि मंजूर केलेल्या काही जागांचा समावेश आहे.
म्हशींच्या कत्तलीस केवळ देवनार कत्तलखान्यातच परवानगी दिली जाईल, हेदेखील मुंबई महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे. मोठ्या प्राण्यांच्या कत्तलीसाठी मुंबईत हाच अधिकृत कत्तलखाना आहे.
गृहनिर्माण सोसायट्यांच्या आत कुर्बानी दिली जाऊ शकते?
बकरी ईदला पशुहत्येची परवानगी देण्यावरून दरवर्षी रहिवासी, गृहनिर्माण संस्था, राजकीय गट आमनेसामने आलेले पाहायला मिळतात. २०१९ साली मुंबई उच्च न्यायालयाने यासंबंधी एक महत्त्वाचा निकाल दिला होता.

बकरी ईदसाठी फ्लॅट आणि सोसायटी परिसरात कुर्बानी देण्यास उच्च न्यायालयाने मनाई केली. बकरी ईदसाठी कत्तलखान्याबाहेर तसंच खासगी जागांसाठी देण्यात आलेल्या परवान्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र अशा प्रथांमुळे स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य अशा चिंता निर्माण होऊ शकतात, असेही निरीक्षण न्यायालयाने नोंदविले होते.
मात्र कुर्बानीवर उच्च न्यायालयाने पूर्णपणे बंदी घातली नाही. न्यायालयाने म्हटले की, जर गृहनिर्माण संस्थेपासून एक किलोमीटर पायी चालण्याच्या अंतरावर अधिकृत कत्तलखाना किंवा अधिसूचित केलेला सामुदायिक कत्तलखाना उपलब्ध नसेल तर कुर्बानीसाठी परवानगी देता येऊ शकते.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर खासगी घरांमध्ये होणाऱ्या कत्तलीवर बंदी तर सोसायट्यांमधील सार्वजनिक किंवा सामुदायिक जागांवर कत्तलीस पालिकेकडून विहित अटींचे पालन केल्यानंतर मंजूरी मिळू शकते, असा फरक करण्यात आला.
गृहनिर्माण संस्थेला कुर्बानीच्या परवानगीसाठी कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतात?
बकरी ईदनिमित्त खासगी जागेवर कत्तलीसाठी तात्पुरती परवानगी हवी असल्यास मायबीएमसी पोर्टल किंवा मोबाइल ॲप्लिकेशनवर जाऊन संबंधित जागेची सर्व माहिती द्यावी लागेल. ज्याठिकाणी कुर्बानी द्यायची आहे, त्या जागेचा निश्चित तपशील, कागदपत्रे अपलोड करावी लागतात. तसेच स्वच्छता, कचऱ्याची विल्हेवाट याबद्दल सविस्तर माहिती द्यावी लागते.
जर एखाद्या प्रकरणात गृहसंस्था किंवा रहिवासी संकुलात कत्तलीची परवानगी हवी असेल तर संबंधित सोसायटीकडून तसे ना हरकत प्रमाणपत्र मिळवावे लागते.
सर्व अटींची पूर्तता होत असेल तरच महानगरपालिका बंदिस्त आणि नियंत्रित जागेतच कत्तलीची परवानगी देते. तसेच यामुळे कोणताही सामुदायिक तणाव निर्माण होणार नाही, याचीही खबरदारी घेतली जाते. रक्त, प्राण्यांचे अवशेष आणि कचरा यांची योग्य विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे. तसेच कत्तलीमुळे सार्वजनिक हालचालीस अडथळा निर्माण होत असेल किंवा प्राण्यांच्या वाहतुकीचे नियम मोडल्यास परवानगी दिली जात नाही.
