जालना – बनावट दस्तऐवज तसेच शासकीय संगणक प्रणालीचा गैरवापर करून कृषी नुकसानीबद्दल शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या २४ कोटी ९० लाख रुपये अनुदानाचा अपहार झाल्याच्या संदर्भात दाखल गुन्ह्यात पोलिसांनी आठव्या आरोपीस अटक केली आहे.
घनसावंगी तालुक्यातील रांजणीवाडी, भुतेगाव ,कृष्णनगर गावांतील नैसर्गिक आपत्तीमुळे पीकहानीचे पंचनामे करण्यात आले होते. हे पंचनामे करून संबंधित शेतकऱ्यांची यादी संगणक प्रणालीवर ‘अपलोड’ करण्यात सहभाग आढळून आल्याच्या आरोपावरून कृषी सहाय्यक केशव कचकलवाड यास स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.
२०२२ ते २०२४ दरम्यान विविध चार शासन निर्णयांद्वारे जालना जिल्हयातील शेतकऱ्यांना पीकांच्या नुकसानीसाठी अनुदान मंजूर करण्यात आले होते. अंबड आणि घनसावंगी तालुक्यांतील २४० गावांत वितरित या अनुदानात अंबड आणि घनसावंगी तालुक्यांतील २४० गावांत वितरित या अनुदानाच्या वितरणात गैरप्रकार झाल्याच्या संदर्भात जिल्हाधिकायांनी नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय समितीने अहवाल सादर केला आहे. अंबड उपविभागीय महसूल कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी तथा प्राधिकृत अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून अंबड पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा नोंदविलेला आहे. त्यानंतर तपासासाठी हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.
शेती नसणारे, इतर जिल्ह्यातील रहिवाशी यांना अनुदान वितरित करणे त्याचप्रमाणे क्षेत्र वाढ दाखवून आणि एका व्यक्तीस दोनदा अनुदान वितरित करण्यात आल्याचा आरोप आहे. ‘महाआयटी’ वरून विकसित करण्यात आलेल्या शासकीय संगणक प्रणालीचा गैरवापर करून अंबड आणि घनसावंगी तालुक्यांत एकूण २४ कोटी ९० लाख ७७ हजार ८११ रुपयांचा अपहार झाल्याचाआरोप आहे. जालना जिल्ह्यातील या घोटाळ्यामुळे अतिवृष्टीतील अनुदान देताना यंत्रणेने अधिकचे निकष लावले. ‘केवायसी ’ झाल्याशिवाय कोणालाही अनुदान दिले जाणार नाही असे ठरविण्यात आले. ही अट रद्द करावी अशी मागणी करण्यात आली होती. अनुदान वाटपातील हा घोळ जालना जिल्ह्यात अधिक प्रमणात असल्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी कृष्णा पांचाळ यांच्या लक्षात आले होते. त्यांनी दिलेल्या या अहवालाच्या आधारे आता अधिकची रक्कम वसुल कशी करायची असा प्रशासनासमोर पेच आहे.
शेती नसणाऱ्यांना अनुदान दिल्याचे लक्षात आल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील आठव्या आरोपीस आता अटक करण्यात आली आहे.
