राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्राप्त एजाज आर्थिक संकटामुळे करतोय मोलमजुरी

शिक्षणासाठी पैसे नसल्याने एक वर्षही वाया गेले ; शासनाकडून कोणतीही ठोस मदत मिळालेली नाही.

“स्वप्न तर खूप आहेत, पण ती पूर्ण करणे शक्य होत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार मिळाला होता. पण आता मला आर्थिक संकटामुळे मोलमजुरी करावी लागते आहे.” अशी शब्दांमध्ये वयाच्या १५ व्या वर्षी राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार मिळवणारा एजाज नदाफ हा आपली व्यथा मांडतो आहे.

सध्या एजाज मोलमजुरी करून आपले कुटुंब चालवतो आहे. मोठे धैर्य दाखवून दाखवत नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील पार्डी येथे २०१८ मध्ये नदीच्या वाहत्या प्रवाहात एजाजने दोन मुलींचा जीव वाचवला होता. एजाज नदाफ या शाळकरी विद्यार्थ्याला राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या हस्ते २०१८ मध्ये राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यावेळी एजाज हा केवळ १५ वर्षांचा होता, तो पार्डी येथील रहिवासी असून सध्या त्याला पोटाची खळगी भरण्यासाठी केळीच्या गाडीवर मजुरी करावी लागते आहे. एजाज मोलमजुरी करुन दिवसाला केवळ ३०० रुपये कमवतो आहे. अत्यंत गरीब परिवारात जन्मलेल्या एजाज नदाफचे आई-वडील शेतात मजुरी करतात. त्याच्याकडे बारावीच्या परीक्षेची फी भरण्यासाठीही पैसे नव्हते, त्यामुळे त्याचे एक वर्ष वाया गेले. यंदा बारावीत एजाजला ८२ टक्के गुण मिळाले आहेत. पण पुढील शिक्षणासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. सरकारने मदत करण्याची गरज असल्याचे त्याचे आई सांगते.

जिल्हा परिषदेने यापूर्वी एजाज नदाफला घरकुल मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते. पण आतापर्यंत कोणत्याही योजनेचा लाभ त्याला मिळालेला नाही. तसेच नोकरीही देण्याचे आश्वासनही त्याला देण्यात आले होते. सध्या एजाज आणि त्याचे कुटुंब परिस्थितीशी संघर्ष करत अच्छे दिन येण्याची वाट पाहत आहेत. एजाजकडे राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराचे प्रमाणपत्र ठेवण्यासाठी साधे कपाटही नाही. सध्या रेल्वेचे राज्यमंत्रीपद महाराष्ट्राकडे आहे. त्यामुळे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी यात लक्ष घालून एजाजला रेल्वेमध्ये नोकरी दिली तर बरे होईल, अशी विनंती एजाजला मदत करणारे सामाजिक कार्यकर्ते नागोराव भांगे यांनी केली आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून दोघांचे प्राण वाचवणाऱ्या एजाजला राष्ट्रीय पुरस्कार तर मिळाला. पण त्यानंतर एजाजला काहीही मिळालेले नाही, त्याच्यावर शिक्षण सोडून देण्याची वेळ आली आहे.

यासंदर्भात एजाजला घराचे आश्वासन देणाऱ्या जिल्हा परिषदेच्या बबन बारसे यांनी आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधला, तेव्हा त्यांनी सांगितले की, ” एजाज नदाफला बाल शौर्य पुरस्कार मिळाल्यानंतर आम्ही जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत त्याचा सत्कार घडवून आणला. त्यावेळी त्याला घरकुल मंजूर करावे अशी मागणी मी सभागृहाकडे केली होती. परंतु त्यानंतर हे काम दफ्तर दिरंगाईत अडकले. कुटुंब प्रमुखांनीही वेळ दिला नाही. येत्या काही दिवसात लवकरच या कामाची फाईल पुढे सरकवून त्याला घरकुल मंजूर करून देण्यासाठी मी प्रयत्न करीन.” असे त्यांनी सांगितले. पण राज्य शासनामार्फत आतापर्यंत या मुलाविषयी कुठली दखल घेतली नसून व केंद्र शासनाने घेतली नाही. मात्र कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील औरत तालुका येथील शाईन अकॅडमी यांनी पुढील शिक्षण घेण्याकरिता या मुलाला दत्तक घेतले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ejaz a recipient of national child bravery award is doing mercenary work due to financial crisis msr

Next Story
“जनाब संजय राऊतांसारखा खुशामतगिर परत होणे नाही”
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी