तीन चार दिवस संसार केल्यावर अजित पवारांवर कशी टीका करतील, खडसेंचा फडणवीसांवर निशाणा

खडसे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली

महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री आणि वरिष्ठ भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना खडसेंनी फडणवीसांवर अनेक आरोप केले. माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्या हॅकर मनिष भंगाळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कशासाठी भेटले? रोहिणी खडसेंच्या परभावाची सलही त्यांनी बोलून दाखवली. मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार असे म्हणत विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेत्यांच्या तिकिटांची काटछाट केल्यामुळेच भाजपाचे सरकार येवू शकले नाही, असा आरोप खडसेंनी केला.

आपल्यावर झालेल्या या अन्यायाबाबत ‘नानासाहेब फडणवीसांचे बारभाई कारस्थान’ नावाचे पुस्तक लिहिणार असल्याचेही खडसे यांनी सांगितले. मुक्ताईनगर येथील आपल्या निवासस्थानी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना पत्रकारांनी त्यांना देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यावर टीका का करत नाहीत? असा प्रश्न विचारला. या प्रश्नाच खडसे यांनी मिश्कील उत्तर दिले.

देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यावर टीकाच करु शकत नाहीत. ते टीका कसे करतील. आपली सर्व सत्वे तत्वे विसरुन अजित पवार यांच्यासोबत दोन-तीन दिवस संसार केला आहे. मुहर्तसाधून लग्नं केलं. शपथ घेतली. मुख्यमंत्री झालो उप मुख्यमंत्री झालो. आता तीन चार दिवस दुसऱ्याच्या घरात राहिल्यावर आम्ही कशी टीका करणार, असे खडसे म्हणाले.

आणखी वाचा : शिवसेनेत यावं, मध्यस्ती करेन; अब्दुल सत्तारांची खडसेंना खुली ऑफर

माझ्यावर आरोपांचे हे षडयंत्र होते. हे षडयंत्र कुणी केले? कसे केले? त्यात कोण होते? कोणत्या मंत्र्याचे पीए होते? कोण अंजली दमानिया यांना भेटत होते, याच्या व्हिडिओ क्लिप देखील माझ्याकडे आहेत. मी हे पुरावे वरिष्ठांना देखील दाखवणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Eknath khadase devendra fadanvis bjp nck