राष्ट्रवादीचे आमदार सतीश पाटील यांच्या सत्कार सोहळ्याला मी उपस्थीत असलो तरी, तुमच्या मनात जे आहे ते माझ्या मनात नाही. माझ्या मनात जे आहे ते मी अजित दादांच्या कानात सांगितले आहे, असे विधान माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी आज सायंकाळी जळगाव येथे केले. हाच धागा पकडून अजित पवार म्हणाले की, खडसे यांनी जे माझ्या कानात सांगितले आहे ते मी येथे जाहीर रित्या सांगणार नाही, अशी गुगली टाकत राज्यात निर्माण झालेला संभ्रम कायम ठेवला. मोपालवर सारख्या अधिकाऱ्याची चौकशी होऊन परत नियुक्तीही केली जाते मात्र चाळीस वष्रे पक्षाला देणारया जेष्ठ नेत्याला असे ताटकळत ठेवले जाते, हे योग्य नाही,असेही पवार म्हणाले. मुख्यमंत्री अजित दादा पवार होतील अशी अपेक्षा कार्यक्रमात व्यक्त झाली, पण यामुळे अजून चौकशी लागून जाईल, असा टोलाही खडसे यांनी लगावला.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतीश पाटील यांचा सर्वपक्षीय सत्कार सोहळा आज जळगाव येथे पार पडला. यावेळी खडसे व पवार एकाच व्यासपीठावर असल्याने सर्वाचे लक्ष या सोहळ्याकडे होते. दोन्ही नेत्याच्या सूचक गुगल्यामुळे राजकीय संभ्रम कायम राहिला.

यावेळी आ. सतीश पाटील यांनी लोकसभा निवडणुकीतील आठवणींना उजाळा दिला. मोदींचा करिष्मा कसा होता याची उदाहरणे दिली. पाटील बोलत असतानाच, व्यासपीठावरून पंधरा लाखांच्या आश्वासनांचा मुद्दा माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवारांनी मांडला व एकच हस्यकल्लोळ उडाला.

सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, मी पूर्वी एरंडोलचा आमदार होतो, त्यामुळे एरंडोल नावातच जादू आहे. एरंडोली करून सर्वपक्षीय सत्कार समारंभ हा होतोय. योगायोगाने नाथाभाऊ, अजितदादा सर्वपक्ष, एकत्र आले, समारंभात पक्ष नसतात, पक्ष वेगळे असले तरी आम्ही एकच, राष्ट्रवादीचे ते एकमेव आमदार असले तरी एकटे आहे, असे वाटत नाही, आम्ही एकच आहोत. लढाई ही विचारांची असते, माणुसकीची नसते, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले. त्यांनी  राजकीय घडामोडींवर बोलणे टाळले. विधानसभेचे माजी सभापती अरूण गुजराथी म्हणाले की,राजकरणात हेही करावे लागते तेही करावे लागते, मात्र आता काळ बदलला असून एकनाथराव खडसे, तुमच्या शेजारी बसले आहे. आजचा गौरव हा आपल्या कार्याचा, विकासाचा गौरव आहे. आज दोन तोफांची उपस्थिती आहे. एक विरोधी पक्षाची व एक सत्ताधारी पक्षाची, मात्र आज काल विधानसभेत सत्ताधारी तोफाही जोरात आहे, नक्की मनात काय आहे, काय माहीत, शेवटी हे राजकारण आहे. अशी फटकेबाजी मनोगतात माजी विधानसभा गुजराथी यांनी केली.