scorecardresearch

एकनाथ खडसे यांची प्रकृती खालावली; पत्रकार परिषद रद्द, ईडीसमोर हजर राहणार का?

एकनाथ खडसे यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप असून, ईडीकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. ईडीने समन्स बजावलेलं आहे. चौकशीला हजर राहण्यापूर्वी खडसे पत्रकार परिषद घेणार होते…

एकनाथ खडसे यांची प्रकृती खालावली; पत्रकार परिषद रद्द, ईडीसमोर हजर राहणार का?
एकनाथ खडसे यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप असून, ईडीकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. ईडीने समन्स बजावलेलं आहे. चौकशीला हजर राहण्यापूर्वी खडसे पत्रकार परिषद घेणार होते…(Photo by Ganesh Shirsekar)

पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे अडचणीत सापडले आहेत. एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ईडीने अटक केली आहे. त्यानंतर एकनाथ खडसे यांनादेखील समन्स बजावण्यात आलेलं असून, त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आली आहे. ईडीसमोर हजर राहण्यापूर्वी खडसे पत्रकार परिषद घेणार होते. मात्र, त्यापूर्वीच त्यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आज होणारी खडसे यांची पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आहे.

पुण्याजवळील भोसरी येथील औद्योगिक वसाहतीतील एका भूखंड प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा ‘ईडी’ला संशय आहे. या भूखंडाची खडसे यांनी २०१६मध्ये गिरीश चौधरी यांच्या नावे फक्त ३.७५ कोटी रुपयांची खरेदी केली होती. त्यामुळे या व्यवहारात मोठा गैरव्यवहार झाला असल्याचा संशय ‘ईडी’ला आहे. या प्रकरणात गिरीश चौधरी यांना ईडीकडून सोमवारी सकाळी चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. रात्री उशीरापर्यंत त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.

हेही वाचा- जावयाच्या अटकेनंतर एकनाथ खडसेंना ईडीचं समन्स

एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक केल्यानंतर ईडीने एकनाथ खडसे यांना समन्स बजावलेलं आहे. ईडीने आज आज एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, अचानक त्यांची प्रकती बिघाडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं याबद्दलची माहिती दिली आहे. त्यामुळे ईडीसमोर हजर होण्यापूर्वी एकनाथ खडसे पत्रकार परिषद घेणार होते. ही पत्रकार परिषदही रद्द झाली असून, प्रकृती खालावल्यानं खडसे चौकशीसाठी हजर राहणार का?, की ईडीकडे चौकशीसाठी वेळ वाढवून मागणार? अशी चर्चा सध्या सुरू आहे.

हेही वाचा- एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी अटकेत

काय आहे प्रकरण?

एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावाई गिरीश चौधरी यांनी २८ एप्रिल २०१६ रोजी भोसरी एमआयडीसी येथील सव्‍‌र्हे क्र. ५२/२ अ ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीन मालकाकडून ३.७५ कोटी रुपयांना खरेदी केली. नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची रीतसर नोंद केली. अशा प्रकारे एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या व त्यांच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक झालेले आहेत. या सर्व व्यवहारात सुमारे ६१ कोटी रुपयांच्या महसुलाचं नुकसान झाल्याचं सकृतदर्शनी दिसून येत आहे. हा मोठा गैरव्यवहार असल्याचा ‘ईडी’ला संशय आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Eknath khadse cancelled press conference eknath khadse health issue ed summons to khadse bmh