Eknath Khadse Devendra Fadnavis promise over Governorship : “देवेंद्र फडणवीस यांनी मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती”, असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला आहे. “फडणवीसांनी मला सांगितलं होतं की मी मनापासून प्रयत्न करेन. याशिवाय त्यांनी त्यांच्या मुलीची शपथ घेऊन मला राज्यपालपदाबाबत आश्वासन दिलं होतं” असंही एकनाथ खडसे म्हणाले. खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी भाजपात परतण्याची पूर्ण तयारी केली होती. मात्र पक्षांतर्गत विरोधामुळे त्यांच्यासाठी भाजपाचे दरवाजे उघडले गेले नाहीत. परिणामी खडसे शरद पवार गटात परत गेले. दरम्यान, आता खडसे यांनी दावा केला आहे की महाराष्ट्र भाजपातील वरिष्ठ नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांना राज्यपालपद देण्याचं आश्वासन दिलं होतं.

एकनाथ खडसे म्हणाले, “एके दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी मला बोलावलं, मी त्यांच्याकडे गेलो. तुम्ही प्रसारमाध्यमं म्हणत आहात ज्याप्रमाणे पंकजा मुंडेंना त्यांनी न्याय दिला, त्याप्रमाणे मला न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला, असं ते मला म्हणाले. फडणवीस मला म्हणाले, मी आता तुम्हाला राज्यपाल करणार आहे. तशी मी वरिष्ठांकडे शिफारस करणार आहे. त्यावर मी त्यांना स्पष्ट म्हणालो, देवेंद्रजी तुम्ही बऱ्याचदा अशी आश्वासनं देता, हे करेन, ते करेन, परंतु तुम्ही ती आश्वासनं पूर्ण करत नाही. त्यामुळे मला खरं सांगा, कारण माझा विश्वास बसत नाही. त्यावर ते मला म्हणाले, आम्ही तुम्हाला राज्यपाल करणार आहोत. मी त्यांना म्हटलं, आनंदाची गोष्ट आहे, मला राज्यपाल केलं तर चांगलंच आहे. परंतु माझा या आश्वासनांवर विश्वास नाही. त्यावर देवेंद्र फडणवीस मला म्हणाले मी माझ्या एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन सांगतो आम्ही तुम्हाला राज्यपाल करणार आहोत. हे देवेंद्र फडणवीस यांचे शब्द जसेच्या तसे मी तुम्हाला जाहीरपणे सांगत आहे”. एकनाथ खडसे एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर बोलत होते.

हे ही वाचा >> Pankaja Munde: “राहुल गांधींबाबत मनोज जरांगे पाटील…”, पंकजा मुंडेंचं टीकास्र; ‘या’ विधानावरून केलं लक्ष्य!

भाजपात प्रवेश का होऊ शकला नाही?

भाजपाचं वरिष्ठ नेतृत्व एकनाथ खडसे यांना अनुकूल आहे. महाराष्ट्रातील त्यांचे संभाव्य प्रतिस्पर्धी देखील त्यांच्या बाजूने आहेत. तरीदेखील त्यांना राज्यपाल पद का दिलं गेलं नाही? किंवा त्यांना भाजपात का घेतलं गेलं नाही? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. यावर खडसे म्हणाले, या प्रश्नांची उत्तरं मी देऊ शकत नाही. पक्षप्रवेश का झाला नाही, राज्यपाल का केलं नाही हे मला माहिती नाही. त्यांनी जे सांगितलं तेच मी तुम्हाला सांगत आहे. फडणवीस यांनी माझ्या राज्यपालपदाची शिफारस केली होती, असं त्यांनीच मला सांगितलं होतं.