“मुख्यमंत्र्यांकडे भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांसाठी वॉशिंग पावडर आहे. त्या वॉशिंग पावडरने नव्याने आलेल्यांना स्वच्छ धुवून घेतले जाते. मग भाजपात आल्यानंतर त्यांना क्लीन चिट दिली जाते आणि ते लोक कामाला लागतात”, अशा शब्दात पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घरचा आहेर दिला आहे.

भाजपमध्ये दुसऱ्या पक्षातून येणारे हे साधुसंत नाहीत. काही संधीसाधुही आहेत. भाजपची संस्कृती आणि नीती-मूल्य मान्य आहेत म्हणून पक्षप्रवेश होत आहेत असेही नाही. केवळ सत्तेची ऊब मिळावी, यासाठी हे सगळे येत आहेत, असेही खडसे म्हणाले. जळगाव येथील घरकुल घोटाळ्याचा निकाल, भाजपामध्ये सुरू असलेले इनकमिंग आणि नारायण राणे यांचा भाजपा प्रवेश इत्यादी विषयांवर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज एबीपी माझा वृत्त वाहिनीशी संवाद साधला. त्यावेळी ते त्यांनी आपली रोखठोक मतं मांडली.

विरोधी पक्षातून भाजपात येणाऱ्या नेत्यांविषयी बोलताना खडसे म्हणाले की आमच्याकडे वॉशिंग मशीन आहे, असं मुख्यमंत्री सांगतात. त्यामुळे भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांसाठी आमच्या मुख्यमंत्र्यांकडे वॉशिंग पावडरही आहे. आम्ही त्यांना स्वच्छ करून पक्षात घेतो. पक्षात घेतल्यानंतर त्यांना क्लीन चिट दिली जाते आणि त्यानंतर ते पुन्हा आपल्या कामाला लागतात. कारण आमचा पक्ष ‘पार्टी विथ डिफरन्स’ आहे, असा मुख्यमंत्र्यांना विश्वास आहे.

या संवादादरम्यान त्यांनी जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निकालाचे स्वागत केले. “सुरेश जैन यांना शिक्षेसाठी उशीर झाला. आरोपींना जन्मठेपेची व्हायला हवी होती. त्यासाठीही प्रयत्न करायला हवेत. जैन यांनी नेहमी सत्ताधारी पक्षात जाऊन संरक्षण घेतले. अन्यथा या प्रकरणाचा निकाल दोन वर्षातच लागला असता”, असेही खडसे यांनी स्पष्ट केले.

राणे भाजपात येणार हे अनेक वर्षांपासून ऐकतोय!

“नारायण राणे भाजपामध्ये प्रवेश करणार, असे अनेक वर्षांपासून ऐकतोय. कोणाला पक्षात घ्यायचे हा प्रत्येक पक्षाला अधिकार आहे. त्यामुळे या प्रकरणी शिवसेनेच्या दबावाला बळी पडण्याचे कारण नाही. छगन भुजबळांना घ्यायचे की नाही, हा जसा शिवसेनेचा निर्णय आहे, तसेच राणेंना घ्यायचे की नाही हा भाजपाचा निर्णय आहे”, असे सूचक वक्तव्य त्यांनी यावेळी केले.