जळगाव जिल्हा बँकेवर एकनाथ खडसेंचे वर्चस्व

भाजप नेत्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकून माघार घेतली.

जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत दीड ते दोन महिन्यांपासून राजकारण रंगले होते. सर्वपक्षीय पॅनल होईल की नाही, यावरही बरीच खलबते झाली. ऐनवेळी काँग्रेसने भाजपसोबत न जाण्याची ठाम भूमिका घेतल्यामुळे बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न फसला. भाजप नेत्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकून माघार घेतली. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलने जिल्हा बँकेवर दणदणीतपणे आपला झेंडा फडकावला.

जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सुरुवातीला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुढाकार घेत सर्वपक्षीय पॅनलची संकल्पना मांडली. त्यानुसार भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन बैठकाही घेण्यात आल्या. मात्र, काँग्रेसने भाजपसोबत न जाण्याची भूमिका स्पष्ट करीत वेगळे पॅनल करण्याचा इशारा दिला होता. भाजपकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांना तपास यंत्रणांच्या माध्यमातून त्रास दिला जात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसनेही भाजपसोबत न जाण्याची भूमिका घेतली होती. बदलती समीकरणे लक्षात घेऊन भाजपचे माजीमंत्री गिरीश महाजन यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला.

अखेरीस शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे महाविकास आघाडीचे सहकार पॅनल रिंगणात उतरले. महाविकास आघाडीत स्थान न मिळाल्यामुळे असंतुष्ट उमेदवारांनी शेतकरी पॅनलद्वारे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचे नेते डी. जी. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे विकास पवार, भाजपचे जिल्हा परिषद सभापती रवींद्र पाटील यांनी शेतकरी पॅनलचे नेतृत्व केले.

महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलचे ११ उमेदवार आधीच बिनविरोध झाले होते. त्यामुळे उर्वरित १० जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. काही जागांमध्येही शेतकरी विकास पॅनलतर्फे महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलच्या उमेदवारांना पािठबा देण्यात आला. काही ठिकाणी ही निवडणूक औपचारिकताच होती. १० जागांसाठी ४२ उमेदवार रिंगणात होते. सहकार पॅनलने बँकेवर आपले वर्चस्व सिद्ध करत २१ पैकी २० जागांवर दणदणीत विजय मिळविला. रावेरमध्ये जाहीर माघार घेणाऱ्या सहकार पॅनलच्या जनाबाई महाजन यांचाही एका मताने विजय झाला. ओबीसी गटातून डॉ. सतीश पाटील, इतर संस्था गटातून माजी मंत्री गुलाबराव देवकर, तर महिला गटातून अ‍ॅड. रोहिणी खडसे आणि शैलजा निकम यांनी विजय मिळविला.

निकालानंतर अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा कालावधी ठरण्याची शक्यता व्यक्त होत असून प्रत्येकी अडीच वर्षांसाठी हे पद निश्चित केले जाऊ शकते. याबाबत खडसे यांचा निर्णय अंतिम राहणार असल्याचे सांगितले जाते. सहकार पॅनलमध्ये संख्याबळात शिवसेना दुसऱ्यास्थानी आहे. त्यामुळे त्यांच्याकडे उपाध्यक्षपद जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेतर्फे ज्येष्ठ असलेले आमदार चिमणराव पाटील नवव्यांदा निवडून आले आहेत. त्यांनी यापूर्वी अध्यक्षपद भूषविलेले असल्याने ते उपाध्यक्षपद घेणार नाहीत, असे मानले जाते. अशा वेळी दुसऱ्यांदा बिनविरोध निवडून आलेले त्यांचे पुत्र अमोल पाटील यांना संधी मिळू शकते.

आमदार किशोर पाटील यांनी हे पद भूषविले आहे, तसेच इतर सदस्य पहिल्यांदा निवडून आले आहेत. मात्र, ज्येष्ठ नेते असलेले प्रताप हरी पाटील स्पर्धेत आहे. आता फक्त

पहिल्या की दुसऱ्या वेळी त्यांना संधी मिळणार, याबाबत आघाडीचे नेतेच ठरविणार आहेत.

दरम्यान, रावेर येथील विजयाबाबत, विजयी उमेदवार जनाबाई महाजन यांचे पती गोंडू महाजन यांनी हा विजय आम्ही गनिमी कावा लढून मिळविल्याचा दावा केला. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राजीव पाटील यांनी पक्षाचा विश्वासघात केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. निवडणुकीत पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलने ११ बिनविरोध, तर निवडणूक झालेल्या १० पैकी नऊ जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी १०, शिवसेना सात, काँग्रेसचे तीन संचालक निवडून आले आहेत. भाजपचे आमदार संजय सावकारे हे अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना प्रत्येकी वीस महिने अध्यक्षपदाची संधी मिळणार असल्याचा दावा काँग्रेसकडून केला जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Eknath khadse dominates jalgaon central co operative bank election zws

Next Story
आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना “संगणक साक्षर” करण्याची योजना बारगळली
ताज्या बातम्या