जळगाव : ट्विटरवर बदनामी केल्या प्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया यांच्या विरुध्द जळगाव न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला.

विविध भ्रष्टाचारांच्या आरोपांमुळे खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. तेंव्हापासून खडसे विरुध्द दमानिया हा वाद दिवसेंदिवस वाढत आहे. दमानिया या जळगाव जिल्ह्यात येऊन खडसे यांच्यावर सातत्याने शाब्दिक हल्ले चढवित असल्याने खडसे समर्थकांनी दमानिया यांच्या विरुध्द रावेर न्यायालयात २२ खटले दाखल केले आहेत. या वादात हे आपल्याविरूद्ध दाखल खटल्यांच्या प्रकरणात न्यायालयावर दबाब आणून समन्स काढतात तसेच खडसे हे गुंड आहेत, असे चित्र अंजली दमानिया यांनी ट्विटरवर ट्विट केले. तसेच कार्यकर्त्यांकडून गुन्हे दाखल करून आपल्याविरुध्द खडसेंनी न्यायालयात लढावे, असे जाहीर आव्हान दिले होते. यामुळे खडसे यांनी न्या. एस. आर. गायकवाड यांच्या न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केला. ट्विट प्रकरणी आपण मानहानीचा दावा सादर केला असून या संदर्भात सत्य हळूहळू बाहेर येईल. न्यायालयातून आपल्याविरूद्ध लढा द्यावा, असे अंजली दमानिया यांनी म्हटले होते. त्यांनी सांगितल्यानुसार आपण त्यांच्याविरूद्ध लढा देण्यासाठी न्यायालयात आलो असल्याचे खडसे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.  भारतीय दंडविधान ५०० प्रमाणे मानहानीचा फौजदारी खटला न्यायालयात सादर करण्यात आल्याची माहिती खडसे यांचे कायदेशिर सल्लागार अ‍ॅड. प्रकाश पाटील यांनी दिली.