जळगाव जिल्ह्य़ात भाजपा नाथाभाऊं मुळे मोठी झाली आहे. आताचे आलेले आम्हाला शिकवायला लागले आहेत. या बांडगुळांमुळे नव्हे, नाथाभाऊमुळे पक्ष वाढला आहे, अशी बोचरी टीका ज्येष्ठ नेते व माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे नाव न घेता केली.

वाढदिवसाचे निमित्त साधून जळगाव शहरासह संपूर्ण जिल्हाभरात खडसे समर्थकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यानिमित्ताने शनिवारी रात्री मुक्ताईनगर येथे आयोजित कार्यRमात खडसे यांनी पुन्हा एकदा नाराजीचा सूर आवळला. यापूर्वी भाजपची स्थिती म्हणजे वाणी, ब्राह्मण व धनदांडग्यांचा पक्ष अशी होती. पुढे मुंडे महाजनांच्या काळात बहुजनांना नेतृत्व करण्याची संधी मिळाली. या काळात मीही पक्षासाठी जीवापाड मेहनत घेतली, पक्ष वाढवला. ४० वर्षांच्या राजकीय जीवनात एकही आरोप झालेला झाला नाही. अलीकडे माझ्यावर खोटे आरोप झाले. मला बुडविण्याचा व बदनाम करण्याचा हा प्रयत्न होता. माझी चौकशीही झाली, मात्र आरोपांमध्ये कुठलेही तथ्य आढळले नाही. दुसरीकडे सुभाष देसाई यांच्या ३० हजार एकर जमिनीच्या घोटाळाप्रकरणी कोणीही बोलत नाही. देसाईंची आंतरराष्ट्रीय न्यायधीशांमार्फत चौकशी करणार काय, असा प्रश्नही खडसे यांनी उपस्थित केला.

याप्रसंगी सामाजिक राज्यमंत्री दिलीप कांबळे ,खा. रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे , डॉ. राजेंद्र फडके, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे आदी उपस्थित होते