आकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या पुतण्यासह चौघांविरुद्ध आकोट पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशावरून हे गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस राजकीय दबावाखाली गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करीत होते.
आकोट कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे तीन कोटी रुपयांची विकास कामे करण्यात आली होती. या कामाचे कंत्राट अग्रवाल या कंत्राटदाराकडे होते. या कामावर पणन मंडळाचे अधिकृत वास्तूविशारद हरीश खडसे यांच्यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी होती. प्रत्यक्षात ते काम निकृष्ट दर्जाचे झाले. एका त्रयस्थ संस्थेने केलेल्या पाहणीत हा प्रकार आढळून आला. न केलेल्या कामाची देयके मंजूर करावी असा दबाव  हरीश खडसे यांनी बाजार समितीवर आणला होता. या प्रकरणाची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली होती, पण गुन्हे दाखल केले गेले नव्हते.
 हिवाळी अधिवेशनाच्या काळात ‘लोकसत्ता’ने हे प्रकरण उचलून धरले. आरोपी हरीश खडसे हे एकनाथ खडसे यांचे पुतणे आहेत. राजकीय दबावामुळे पोलीस कारवाई करीत नाही हे बघून बाजार समितीच्या सचिवांनी न्यायालयात धाव घेतली होती. अखेर आज न्यायालयाने याची दखल घेऊन या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी रमेश हिंगणकर, हरीश खडसे, कंत्राटदार सुनील अग्रवाल व माजी सचिव मोहसन बेग मिर्झा यांच्याविरोधात  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.