“विरोधीपक्ष नेत्याने केवळ प्रसिद्धीसाठी सरकारवर आरोप करु नयेत. पुरव्यासहित संपूर्ण अभ्यास करुनच सरकारवर आरोप केले पाहिजेत,” असा सल्ला भाजपाचे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून फडणवीस यांची निवड झाल्यानंतर खडसेंनी त्यांना हा सल्ला दिला आहे. फडणवीस यांच्या निवडीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विरोधी पक्षनेत्याचे काम कसे असते याबद्दलचे भाष्य केले.

सरकारवर केवळ प्रसिद्धीसाठी आरोप करु नये असा सल्ला खडसे यांनी फडणवीस यांना दिला. “विरोधी पक्षनेत्याकडून होणाऱ्या आरोपांचे त्याच्याकडे पुरावे असले तर त्याच्या बोलण्याला अधिक महत्व प्राप्त होते. आरोप करताना पुरवाने देण्याची काळजी विरोधी पक्षनेत्याने घ्यायला हवी. विरोधी पक्षनेत्याचे पद हे शिष्टाचारानुसार मुख्यमंत्र्यांच्या खालोखाल असते. हा नेता उद्याचा सत्ता बदल घडवून आणणार नेता आहे या दृष्टीकोनातून त्याच्याकडे पाहिले जाते. त्यामुळेच सरकारला जाब विचारून जनतेची कामे करून घेणे, ही विरोधी पक्षनेत्याची प्रमुख जबाबदारी असते,” असं मत खडसेंनी व्यक्त केलं.

विधानसभेत रविवारी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी आपल्या विरोधी पक्षनेतेपदाच्या कारकीर्दीचे कौतुक केले. विधानसभेत कदाचित अनुभवी नेत्याची उणीव भासत असेल, म्हणून या दोन्ही नेत्यांनी आपली आठवण काढली असावी. आपणास असलेल्या विधानसभेच्या प्रदीर्घ अनुभवामुळेच आपण विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडू शकलो होतो असंही खडसे यावेळी बोलताना म्हणाले.

रविवारी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी पक्षनेतेपदी फडणवीस यांची निवड झाल्याची घोषणा सभागृहात केली. “विधानसभेतील विरोधी पक्ष नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांना मान्यता देण्यात यावी अशी विनंती भाजपाने आपल्याकडे केली आहे. त्यामुळे अधिकृत विरोधी पक्ष म्हणून मी भाजपाला मान्यता देत आहे. तसेच भाजपाने गटनेते देवेंद्र फडणवीस हे १ डिसेंबर २०१९ पासून विरोधी पक्ष नेते असतील असे मी जाहीर करतो,” असं नाना पटोले यांनी फडणवीस यांच्या नावाची घोषणा करताना सांगितले. त्यानंतर सभागृहाचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील, काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांचे अभिनंदन केले.