छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या सहा खासदारांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री अमित शहा यांची मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास भेट घेतली. या भेटीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये दाखल झालेल्या सहा खासदारांची नव्याने ओळख आणि त्यांच्या मतदारसंघातील प्रश्नावर गृहमंत्र्याबरोबर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

नव्याने नारीशक्ती आणि मतदारसंघ फेररचनेचे विधेयक मांडले जाण्याची चर्चा सुरू असताना तसेच केंद्रीय मंत्रिमंडळातही बदल होण्याची चर्चा सुरू असताना शिंदे आणि अमित शहा यांची ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या भेटी दरम्यान खासदारांनी आपापल्या मतदारसंघातील प्रश्न गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर मांडण्यात आले.

केंद्रीय पातळीवर होणाऱ्या राजकीय घडामोडीमध्ये शिवसेनेचे सहा खासदारांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. फुटीनंतर या सर्वांची एकत्रित भेट झाली नव्हती. ती मंगळवारी रात्री झाल्याने आता राजकीय घडामोडीबरोबरच या सहा मतदारसंघातील अडकलेल्या प्रकल्पांचा निधप्रश्न मार्गी लागेल, असा दावा केला जात आहे. मराठवाड्यातील काही प्रश्नांवर या बैठकीत चर्चा झाली.

केंद्रीय विद्यालयांची गरज, सिंचनाचे प्रश्न, विशेषत: कृष्णा – मराठवाडा सिंचन प्रकल्प केंद्र सरकारकडे वर्ग करुन त्यातून पाच हजार कोटी रुपयांची मागणी खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी नुकतीच केली होती. ही बाब गृहमंत्री अमित शहा यांच्या कानावर घातल्याचे ते म्हणाले. परभणी, हिंगोली आणि धाराशिवमधील केंद्राच्या योजनांमधील अडथळे आणि सहकार विभागाच्या मागण्या यावर चर्चा झाली आहे. या सहा फुटीर खासदारांमध्ये सर्वात पहिल्यांदा खासदार संजय जाधव यांनी ठाकरे गट सोडणार, असे जाहीर केले होते. तर सर्वात शेवटी ओम राजेनिंबाळकर यांनी या प्रस्तावास होकार दिला होता. यामुळे मंत्रिमंडळ फेरबदलांमध्ये परभणी किंवा धाराशिव येथील खासदार असू शकतात, अशी चर्चा पेरली जात आहे.

शिवसेनेच्या फुटलेल्या सहा खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी मेळावा घेऊन शिवसैनिकांशी चर्चा केली. या सहा खासदारांविराेधात मतदारसंघात निर्माण झालेले वातावरण लक्षात घेता केंद्रीय पातळीवरुन या मतदारसंघात मोठे प्रकल्प मंजूर होण्याची घोषणाही होईल, असे सांगण्यात येत आहे. मराठवाड्यात लॉजिस्टिक पार्कसह अनेक मागण्या नव्याने करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.