सातारा जिल्ह्यातील प्रतापगडावर आज शिवप्रतापदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली. गड-किल्ल्यांवरील सर्व अतिक्रमणं आगामी काळात काढण्यात येतील. निधीची कोठेही कमतरता भासणार नाही. गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्यात येईल. शिवरायांचा इतिहास आपल्याला प्रेरणा देणारा आहे. त्यामुळे या गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करण्यात येईल. या प्राधिकरणांतर्गत गड-किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम केले जाईल, अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली. प्रतापगडावर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले, मंत्री शंभुराज देसाई, मंत्री मंगलप्रभात लोढा आदी नेत्यांची उपस्थिती होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>आदित्य ठाकरेंनी CM शिंदेंना जाहीर चर्चेचं आव्हान दिल्यानंतर भाजपाने दिलं प्रत्युत्तर, म्हणाले “माजी मुख्यमंत्री घरी…”

छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की अंगावर शहारे येतात. मला छत्रपतींचा भगवा झेंडा फडकवण्याचे भाग्य लाभले. आज येताना अनेक कार्यकर्ते, शिवभक्त रस्त्याने भेटत होते. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. विलक्षण आनंद होता. आपल्या महापराक्रमी राजाच्या पराक्रमाची साक्ष देणारा हा परिसर आहे. इथली माती महाराजांचे शौर्य, पराक्रमाची साक्ष देते, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

शिवरायांनी महाराष्ट्र घडवला. हे राष्ट्र घडवले. संपूर्ण जग शिवरायांकडे एक आदर्श राजा म्हणून पाहते. गडांची बांधणी पाहून आपल्याला आश्चर्य वाटते. गडाचे प्रवेशद्वार, पाण्याची साठवण, तोफा यांची भव्यता पाहून सध्याचे जग अजूनही किती मागे आहे, अशी भावना येते, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा >>> The Kashmir Files Controversy: “नदाव लॅपिड म्हणजे इस्त्रायलमधले जितेंद्र आव्हाड”

“अनेक शिवभक्त, तसेच मावळ्यांची एक भावना होती. या गडावर असलेले अतिक्रमण दूर झाले पाहिजे, असे मत प्रत्येकाचे होते. कायद्याने, नियमाने काम करण्याचे धाडस काही लोक दाखवत नव्हते. मात्र छत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आता आपले सरकार स्थापन झाले आहे. आपल्या प्रत्येक मंत्रीमंडळ बैठकीत लोकहिताचे निर्णय घेण्यात येतात. न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रतापगडावरील अतिक्रमण काढून टाकण्याची कारवाई करण्यात आली. शिवाजी महाराजांचा इतिहास कोणालाही पुसता येणार नाही. शिवरायांची साक्ष देणारा प्रत्येक विषय राज्य सरकार पुढे नेल्याशिवाय राहणार नाही,” अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली.

“३६३ वर्षांपूर्वी अफझलखानाने महाराष्ट्रावर चालून येण्याचे धाडस केले. खानाने वार केल्यानंतर महाराजांनी त्याच्यावर प्रतिवार करून त्याचा कोथळा बाहेर काढला. शिवाजी महाराजांकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. फक्त शिवाजी महाराजांचे नाव घेऊन आपल्याला शांत बसता येणार नाही. तर त्यांच्या शिकवणीप्रमाणे आपल्याला महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्याचे काम करावे लागेल,” अशा भावना शिंदे यांनी व्यक्त केल्या.

हेही वाचा>>> शिवप्रतापदिनाच्या कार्यक्रमाला उदयनराजे अनुपस्थित? राज्यपालांच्या शिवरायांवरील विधानामुळे नाराज असल्याची चर्चा

“शिवाजी महाराज यांनी जलदुर्ग बांधले. आजही अनेक किल्ले शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देतात. शिवाजी महाराज यांना आरमाराचे जनक म्हटले पहिजे. हे किल्ले नव्या पिढीला प्रेरणा देणारे आहेत. या किल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे,” असेही शिंदे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde announce for authority for conservation of shivaji maharaj forts prd
First published on: 30-11-2022 at 13:01 IST