बृहन्मुंबई महानगरपालिकेने शहराच्या समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जुहू किनाऱ्यावरील स्वच्छता कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता करणारा ट्रॅक्टर स्वत: चालवला. या ट्रॅक्टरवरून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका होत आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटातील नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना समुद्रावर ट्रॅक्टर चालवणारा मुख्यमंत्री असं म्हणत टीका केली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, “समुद्रावर ट्रॅक्टर चालवणारा पहिलाच मुख्यमंत्री आपण पाहिला. लोकांच्या, शेतकऱ्यांच्या घरावर नांगर आणि समुद्रावर ट्रॅक्टर फिरवणारा मुख्यमंत्री पहिल्यांदाच पाहायला मिळाला.
ठाकरे गटातील आमदार आदित्य ठाकरे यांनीदेखील यावरून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे, “मी पाहिलेला फोटो हास्यास्पद आहे. समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता करणारे ट्रॅक्टर पाण्यात चालवून काही उपयोग आहे का? फोटोसाठी पोज तरी नीट द्यायची. एवढ्या वर्षाची ओळख आहे, मला फोन करून विचारायला हवं होतं. आमच्या सहकाऱ्यांना पक्ष प्रवेशासाठी फोन करता, मग मला फोन करून मी समुद्रकिनारे स्वच्छ करण्यासाठी काय केलं? हे विचारायला हवं होतं. ट्रॅक्टर घेऊन तुम्ही पाण्यात जाता. ही गोष्ट हास्यास्पद आहे
दरम्यान, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या टीकेला एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. पत्रकारांनी आदित्य आणि उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेबद्दल विचारल्यावर मुख्यमंत्री आधी हसले आणि म्हणाले, तो ट्रॅक्टर कसला होता याची त्यांनी आधी माहिती घ्यायला हवी होती. तो बीच कॉम्बर होता. म्हणजे समुद्रात, बीचवर दगड आणि प्लास्टिकसह जो कचरा असतो तो या बीच कॉम्बरच्या जाळीत अडकतो. या ट्रॅक्टरच्या मागे कॉम्बरच्या जाळीत सगळं अडकतं. हा कचरा वेगवेगळा केला जातो. यामुळे बीचवर केवळ वाळू राहते.
हे ही वाचा >> “मंत्रिपदाच्या बातमीने मनात लाडू फूटतात, पण…”, भरत गोगावले यांनी व्यक्त केली खंत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, खरंतर बोलणाऱ्यांनी पूर्ण माहिती घ्यायला हवी होती. मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर ज्यांनी जेसीबी चालवला, मुंबईच्या विकासावर बुलडोझर फिरवला त्यांचं आपण काय करणार. मी दिल्लीला किंवा तेलंगणाला गेलो, शेती करायला गेलो, बीचवर सफाई करायला गेलो तरी यांना अडचण होते. मी जनेतला विचारतो की तुम्हाला घरी बसणारा मुख्यमंत्री हवा आहे की दिल्ली ते गल्लीपर्यंत सगळीकडे काम करणारा मुख्यमंत्री हवा आहे?