कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांना मारहाण केल्याप्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक रमेश म्हात्रे यांना काल अटक केली आहे. शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना झालेल्या या मारहाणीनंतर संपूर्ण राज्यातून संतापाची लाट उसळली असून वैद्यकीय संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाला मोठे राजकीय आणि सामाजिक वळण मिळाले आहे. या सगळ्या प्रकरणावर आता शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे.

शिंदेंचा फोन, उदय सामंतांनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका

रमेश म्हात्रे यांच्या अटकेनंतर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेची (शिंदे गट) अधिकृत भूमिका स्पष्ट करत या कृत्याचा निषेध केला आहे. माध्यमांशी बोलताना सामंत म्हणाले, “शिवसेनेच्या कोणत्याही लोकप्रतिनिधीने, पक्षाच्या नेत्यांनी किंवा स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित नगरसेवकाच्या या कृत्याचे समर्थन केलेले नाही.”

पुढे बोलताना सामंत यांनी स्पष्ट केले की, “पक्षाच्या शिस्तीची आणि नियमांची जाणीव करून देण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रमेश म्हात्रे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला होता. या प्रकरणात म्हात्रे यांना पक्षातून कोणाचाही पाठिंबा नाही. तसेच, पोलिसांनी केलेल्या कायदेशीर कारवाईत कोणत्याही नेत्याने किंवा सरकारने कोणताही हस्तक्षेप केलेला नाही.”

वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप

शास्त्रीनगर रुग्णालयात घडलेल्या या प्रकारानंतर राज्यातील वैद्यकीय क्षेत्रातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. “रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टरांवरच जर असे जीवघेणे हल्ले होणार असतील, तर त्यांनी काम कसे करायचे?” असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या घटनेमुळे सरकारी रुग्णालयांतील डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, दोषींवर डॉक्टर संरक्षण कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी विविध वैद्यकीय संघटनांनी लावून धरली आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

कल्याण-डोंबिवली पालिकेच्या कोपर भागातील शास्त्रीनगर रुग्णालयात सोमवारी संध्याकाळी ही धक्कादायक घटना घडली. शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांनी रुग्णालयात घुसून दोन डॉक्टर (ज्यात एका महिला डॉक्टरचा समावेश आहे) आणि दोन परिचारिकांना (नर्सेस) बेदम मारहाण केली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मारहाणीनंतर म्हात्रे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना, “तुम्ही रुग्णालयातून फक्त बाहेर पाऊल टाका, तुम्हाला संपवून टाकतो,” अशी थेट जीवे मारण्याची धमकीही दिली. डॉक्टरांच्या तक्रारीनंतर विष्णुनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत रमेश म्हात्रे यांना अटक केली आहे.