रत्नागिरी : कोकणातील पर्यावरण आणि स्थानिक नागरिकांच्या भावना लक्षात घेता, लक्ष्मी ऑरगॅनिकसारखे प्रदूषणकारी उद्योग प्रकल्प चिपळूणसह कोकणात सुरू होऊ दिले जाणार नाहीत, असा ठाम इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. चिपळूण येथे आयोजित महायुतीच्या जाहीर सभेत ते बोलत होते.

कोकण हा निसर्गसंपन्न आणि पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भाग असल्याचे सांगत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, उद्योग विकास आवश्यक असला तरी तो पर्यावरणपूरक आणि स्थानिकांच्या हिताचा असलाच पाहिजे. प्रदूषण वाढवून कोकणातील नागरिकांच्या आरोग्यावर तसेच शेती व मत्स्यव्यवसायावर विपरीत परिणाम करणारे प्रकल्प सरकार सहन करणार नाही.

लक्ष्मी ऑरगॅनिक प्रकल्पामुळे संभाव्य प्रदूषणाचा धोका असल्याच्या कारणावरून गेल्या काही महिन्यांपासून चिपळूण, खेड व लोटे परिसरात तीव्र विरोध सुरू आहे. स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी संघटना तसेच विविध राजकीय पक्षांनी आंदोलन उभारले असून, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंच्या विधानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका मांडली असली, तरी पुढे या प्रकल्पाबाबत नेमकी कोणती कारवाई होणार, मंजुरी रद्द केली जाणार का किंवा शासन स्तरावर कोणते ठोस आदेश निघणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थानिक नागरिकांनी केवळ आश्वासन नको, तर ठोस निर्णय अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

कोकणातील पर्यावरणाच्या संरक्षणासाठी प्रदूषणकारी प्रकल्पांवर कायमची बंदी घालावी, अशी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. या घोषणेमुळे महायुती सरकार कोकणातील पर्यावरण संवर्धनाबाबत गंभीर असल्याचा संदेश गेल्याचे मानले जात आहे. मात्र प्रत्यक्ष निर्णय आणि कारवाई लवकर झाली, तरच नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.

या सभेला उद्योगमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, भाजप नेते प्रशांत यादव तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.