scorecardresearch

पुरुषप्रधान मंत्रीमंडळ असल्याचा आरोप, एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर, म्हणाले, “अरे बाबा…”

शिंदे-फडणवीस सरकारचं मंत्रीमंडळ पुरुषप्रधान असल्याचा आरोपही होतोय. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच विचारणा केली असता त्यांनी प्रतिक्रिया दिलीय.

पुरुषप्रधान मंत्रीमंडळ असल्याचा आरोप, एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर, म्हणाले, “अरे बाबा…”
एकनाथ शिंदे (संग्रहित छायाचित्र)

शिंदे-फडणवीस सरकारचा सत्तास्थापनेनंतर अखेर एक महिन्याने मंत्रीमंडळ विस्तार झाला. मात्र, मंत्रिमंडळातील वादग्रस्त नावं आणि एकाही महिला आमदाराचा मंत्री म्हणून समावेश न झाल्याने जोरदार टीकाही झाली. याच कारणामुळे शिंदे-फडणवीस सरकारचं मंत्रीमंडळ पुरुषप्रधान असल्याचा आरोपही होतोय. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच विचारणा केली असता त्यांनी प्रतिक्रिया दिलीय. ते मंगळवारी (९ ऑगस्ट) मुंबईत मंत्रीमंडळ शपथविधीनंतर माध्यमांशी बोलत होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, “अरे बाबा, पुढे आणखी मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे. आमची सर्वसमावेशक भूमिका आहे. आमच्या मंत्रिमंडळावर जी टीका होते त्याला आम्ही काम करून उत्तर देणार आहोत. सरकार काम करणार आहे. लोकांना काय अपेक्षित आहे? सर्व वर्गाला, सर्व घटकांना न्याय दिला पाहिजे. आमचं सरकार लोकाभिमुख आहे, सर्वसामान्यांचं आहे. त्यामुळे आम्ही काम करून उत्तर देऊ.”

“राज्याला केंद्र सरकारचा देखील पाठिंबा”

“राज्याला केंद्र सरकारचा देखील पाठिंबा आहे. विशेष म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी मागील दोन ते तीन बैठकींमध्ये महाराष्ट्रासाठी फायद्याचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे राज्याचा विकास वेगाने आणि चांगल्या गतीने होईल,” असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

“आमच्या शिवसेनेत कुणीही नाराज नाही”

संजय शिरसाट नाराज असल्याच्या चर्चांबाबत विचारलं असता एकनाथ शिंदे म्हणाले, “संजय शिरसाट नाराज नाहीत. ते इथं शपथविधीला होते. ते समोर बसले होते. आमच्या शिवसेनेत कुणीही नाराज नाही. ही एक प्रक्रिया आहे. यावेळी आमच्याकडे थोडीच मंत्रिपदं होती. त्यामुळे सगळे समजून घेतात. मंत्रीमंडळ विस्ताराचा पुढील टप्पा लवकरच होईल.”

“पोलिसांनी संजय राठोड यांना क्लीन चिट दिली होती”

संजय राठोडांबाबत विचारलं असता एकनाथ शिंदे म्हणाले, “महाविकासआघाडी सरकारच्या काळात पोलिसांनी संजय राठोड यांना क्लीन चिट दिली होती. यानंतरही कुणाचे काही विचार असेल, म्हणणं असेल तर नक्की सांगा, ते ऐकून घेतलं जाईल. लोकशाहीत प्रत्येकाला भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे.”

हेही वाचा : Photos : “भ्रष्टाचार, घोटाळे, खंडणी”, ‘ED’ सरकारचे मंत्री असं म्हणत राष्ट्रवादीकडून १८ पैकी १७ जणांवर गंभीर आरोप

“…म्हणून राठोडांचा मंत्रिमंडळात समावेश”

“सर्वांना माहिती आहे की, पोलिसांनी त्या प्रकरणाचा तपास केला. त्या तपासात काहीच निष्पन्न झालं नाही. त्यामुळे त्यांना क्लीन चिट देण्यात आली. म्हणून राठोडांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे,” असंही शिंदेंनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या