शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे सहा खासदार फुटले आहेत आणि ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेले आहेत. ज्यानंतर उद्धव ठाकरेंनी सहाही खासदारांच्या मतदार संघात जाऊन दौरे सुरु केले आहेत. संजय देशमुख यांच्या वाशिम यवतमाळ मतदारसंघात जाऊन उद्धव ठाकरेंनी भाषण केलं. त्यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंचा उल्लेख गद्दारांचे शिरोमणी असा केला. तसंच सहा खासदारांनीही गद्दारी केली म्हणून मी तुमची माफी मागायला आलो आहे असंही म्हटलं होतं. यावर एकनाथ शिंदेंना विचारलं असता बुंद से गयी वो हौदसे नही आती म्हणत उद्धव ठाकरेंवर त्यांनी टीका केली.
उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यांबाबत काय म्हणाले एकनाथ शिंदे?
मी काय बोलणार त्यांच्याबद्दल? जाहीर सभा घ्यायला मीच लावल्या आहेत. मी कामाला लावलंय सगळ्यांना. खरंतर एक म्हण आहे की वरातीमागून घोडे, सगळे निघून गेल्यावर आता ते (उद्धव ठाकरे) पोहचत आहेत. जो बुंद से गयी वो हौद से नहीं आती. असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे जे दौरे करत आहेत त्यावर टीका केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नेते संजय शिरसाट यांनीही उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
संजय शिरसाट काय म्हणाले?
उद्धव ठाकरेंचे जे सहा खासदार शिवसेनेत आहेत आता उद्धव ठाकरेंच्या नेत्यांनी विदर्भ आणि मराठवाड्याचा दौरा सुरु केला आहे. हा दौरा कशासाठी आहे तर फक्त टोमणे मारण्यासाठी. एकच गोष्ट सांगत आहेत हे कितीमध्ये विकले गेले. का गेले याचा विचार त्यांनी (उद्धव ठाकरे) केलेला नाही. जेव्हा आम्ही सोडून गेलो तेव्हा त्यांचे फोन येत होते. आम्हाला परत बोलवलं जात होतं. आता फक्त हिणवण्यासाठी दौरे करत आहेत, हे सगळं उशिराचं शहाणपण आहे. आश्चर्याची बाब ही पण आहे की या भाषणांमध्ये हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो म्हणत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी कुठे गेलं होतं तुमचं हिंदुत्व? असा प्रश्न संजय शिरसाट यांनी विचारला. तसंच संजय शिरसाट म्हणाले की पक्ष फुटायला कुणी जबाबदार असेल गद्दार उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी आहेत अशी बोचरी टीका संजय शिरसाट यांनी केली. मुख्यमंत्रिपदासाठी जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह गेले तर मग गद्दार कोण? फोन आला की एकनाथ शिंदेंना सांगायचे की एकनाथ तुला बोलायचं तर बोल. पक्षप्रमुख बोलणार नाही? पुढे काय दिवे लावले गेले ते सगळ्यांनी पाहिलं. अशीही टीका संजय शिरसाट यांनी केली.
