गणेशोत्सवानिमित्त आपल्या साताऱ्यातील ‘दरे’ या मूळ गावी आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतीतील विविध प्रयोगांची माहिती देतानाच विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. “मी गावी आलो, दिल्लीला गेलो किंवा लंडनला गेलो, तरी विरोधकांच्या पोटात दुखायला लागतं. आता या विरोधकांच्या पोटदुखीवरही कोणतं झाड आहे का, हे बघून त्याची लागवड करावी लागेल किंवा त्यांना जमालगोटा द्यावा लागेल,” असा सणसणीत टोला त्यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना लगावला.
जागतिक बांबू दिनाचे औचित्य साधून एकनाथ शिंदे यांनी आपल्या शेतात बांबूची लागवड केली. या वेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी दरे गावातील आपल्या शेतात केलेल्या आधुनिक शेती प्रयोगांची सविस्तर माहिती दिली.
शेतीत अनोखा प्रयोग: सफरचंद अन् ब्ल्यूबेरीची यशस्वी लागवड
पहाडी आणि थंड हवेच्या प्रदेशात येणारी सफरचंदं अन् ब्ल्यूबेरी महाराष्ट्रात येऊ शकतात, असा विश्वास कोणालाच नव्हता. मात्र, शिंदेंनी हा प्रयोग दरे गावात यशस्वी करून दाखवला आहे. त्यांनी पुढील माहिती दिली..
- प्रयोगाची वैशिष्ट्ये: शेतात सफरचंद, ॲव्होकॅडो, जांभूळ, आवळा आणि काळी मिरी या पिकांची तब्बल १४,००० रोपे लावली आहेत.
- ब्ल्यूबेरीचा मोठा प्रयोग: परदेशातून मोठ्या प्रमाणावर आयात करावी लागणारी ‘ब्ल्यूबेरी’ आता महाराष्ट्रात पिकणार आहे. शिंदेंनी सुमारे ४,००० ब्ल्यूबेरीची रोपे लावली असून हा प्रयोग पूर्णपणे यशस्वी झाला आहे.
- कापूर अन् हिंगाची भर: याशिवाय यंदा त्यांच्या शेतीत कापूर आणि हिंग या दोन नवीन झाडांचीही प्रायोगिक तत्त्वावर लागवड करण्यात आली आहे.
“टीकेला शब्दांनी नाही, कामातून उत्तर देणार!”
लंडन दौऱ्यावरून आणि गावी येण्यावरून टीका करणाऱ्या विरोधकांना उत्तर देताना शिंदे म्हणाले, “मी गणेशोत्सवासाठी गावी आलोय, नाराज होऊन नव्हे. विरोधक काहीही आरोप करत असले तरी मी त्यांना टीकेने नाही, तर माझ्या कामातून उत्तर देईन. मी कामाचा माणूस आहे.”
बांबू लागवडीवर भर आणि शेतकऱ्यांना दिलासा
जागतिक बांबू दिनाचे महत्त्व सांगताना त्यांनी स्पष्ट केले की, बांबूपासून इथेनॉल निर्मिती, विमानतळांची कामे आणि इतर अनेक उपयोगी वस्तू तयार होतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी बांबू लागवडीवर विशेष लक्ष केंद्रित केले पाहिजे.
तसेच राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीवर बोलताना त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. “राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. ज्या भागांत पिके करपली आहेत, तिथे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पालकमंत्री परिस्थितीचा आढावा घेत असून, मी स्वतः लवकरच दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करणार आहे,” असे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले.
