केंद्रीय निवडणूक आयोगातील मतभेदाची बातमी समोर आल्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मनमानीपणे निर्णय घेतल्याची बातमी द इंडियन एक्सप्रेसने दिली आणि त्यानंतर ज्ञानेश कुमारांवर देशभरातून मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठली आहे. ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहेत.
केंद्रीय निवडणूक आयुक्तांमधील अंतर्गत मतभेदांवरून सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे. या घडामोडीनंतर अखेर निवडणूक आयोगाच्या तिन्ही आयुक्तांनी संयुक्त निवेदन जारी करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या तिन्ही आयुक्तांच्या संयुक्त निवेदनानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.
‘निवडणूक आयोगात अंतर्गत मतभेद असल्याच्या खोट्या व निराधार बातम्या पसरवून इंडिया आघाडीचे नेते आनंदोत्सव साजरा करत होते. मात्र, विरोधकांचं राजकारण हे फक्त फेक नरेटिव्हवरच टिकू शकतं हे पुन्हा एकदा निवडणूक आयोगाच्या संयुक्त निवेदनानंतर सिद्ध झालं. त्यामुळे राहुल गांधींनी जनतेची माफी मागावी’, अशी मागणी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
उपमुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?
“राहुल गांधी यांनी देशाच्या जनतेची माफी मागावी. इंडिया आघाडीचं राजकारण हे फक्त ‘फेक नॅरेटिव्ह’वरच टिकू शकतं, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. निवडणूक आयोगात अंतर्गत मतभेद असल्याच्या खोट्या व निराधार बातम्या पसरवून इंडिया आघाडीचे नेते उर बडवत आनंदोत्सव साजरा करत होते. मात्र, तिन्ही निवडणूक आयुक्तांच्या ‘संयुक्त निवेदना’ने त्यांच्या या फुग्यातली हवा पूर्णपणे काढून टाकली आहे”, असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.
“याच खोट्या मुद्द्याचा आधार घेऊन विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना बदनाम करण्याचा व त्यांच्यावर पातळी सोडून टीका करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. अशा पद्धतीने बदनामीचे राजकारण करणाऱ्या राहुल गांधी व इंडिया आघाडीच्या नेत्यांनी देशाच्या जनतेकडे त्वरित माफी मागितली पाहिजे”, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
“संवैधानिक संस्थांना सतत बदनाम करणं, लोकशाही प्रक्रियांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं आणि जनतेत संभ्रम पसरवणं हाच या इंडिया आघाडीचा मूळ स्वभाव आहे. देशाची जागरूक जनता हा घृणास्पद खेळ चांगल्या प्रकारे ओळखून आहे आणि योग्य वेळी यांना त्यांची जागा नक्कीच दाखवेल. देशाची १४० कोटी जनता मोदी आणि अमित शाह यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. त्यामुळे विरोधी पक्षांच्या खोट्या आरोपांमुळे तसूभरही फरक पडत नाही”, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
