मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार फुटणार, या खासदारांची एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बैठक झाल्याच्या चर्चेनंतर ठाकरे गटाच्या सर्व खासदारांनी आपण फुटणार नसल्याची ग्वाही दिल्याने ठाकरे गटाचे खुंटी अधिक बळकट झाली. या चर्चेनंतर केवळ राजकीय गैरसमज आणि सनसनाटी निर्माण करण्यासाठी वावड्या उठवल्या जात असल्याचा खुलासा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

ठाकरे गटाच्या खासदारांसोबत ठाण्यात गुप्त बैठक घेतल्याची चर्चा सुरू झाली. ‘ऑपरेशन टायगर’ च्या माध्यमातून ठाकरे गटाचे खासदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जाऊ लागले. या चर्चेनंतर अशी काही बैठक झालेली नाही, असा लेखी खुलासा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केला. मागील दीड वर्षांपासून अशा प्रकारच्या बातम्या मुद्दाम पसरवल्या जात आहेत. या बातम्यांमध्ये काडीचेही तथ्य नाही, असे स्पष्ट केले.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार-आमदार फुटणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. त्यात बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथील व्होल्टास येथे ठाकरे गटाच्या खासदारांची बैठक घेलती. ही बैठक सकाळपर्यंत रंगल्याचे वृत्त पसरल्याने एकच खळबळ उडाली. यावर ठाकरे गटाच्या खासदारांकडून तत्काळ खुलासा करीत काहीही झाले तरी आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही अशा आणाभाका घेण्यात आल्या.

या बैठकीला खासदार अरविंद सावंत, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वकचौरे, राजाभाऊ वाजे हे उपस्थित होते तर खासदार ओमराजे निंबाळकर, यांच्यासह दोन खासदार व्हीडिओ काॅलच्या माध्यमातून उपस्थित असल्याचे वृत्त पसरले. यामुळे ठाकरे गटाच्या खासदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली, त्यांच्याकडून तत्काळ खुलासा आल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडूनही अशी कोणतीही बैठक न झाल्याचा खुलासा करण्यात आला.

ठाकरे गटाला दिलासा

खासदार फुटणार असल्याची चर्चा व त्यानंतर सर्व खासदारांनी आम्ही फुटणार नाही, असा केलेला खुलासा यातून ठाकरे गटाला काहीसा दिलासा मिळाला आहे. खासदारांच्या कथित बैठकीची माहिती ठाकरे गटाकडूनच पसरविण्यात आल्याची मंत्रालयात कुजबूज आहे.

शिंदे गटाच्या ऑपरेशनाबाबत आगामी काळात स्पष्ट होईल – गिरीश महाजन

उद्धव ठाकरे यांच्या पक्षात कोणीही आमदार किंवा खासदार राहण्यास उत्सुक नाहीत. हे लोकप्रतिनिधी अन्य पक्षात जाण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना धक्का देण्याची संधी त्यांचे विरोधक सोडणार नाहीत. मात्र सध्या भाऱ्तीय जनता पक्षाचे कोणतेही ऑपरेशन लोटस सुरू नाही. शिवसेना शिंदे गटाच्या ऑपरेशनचे काय ते आगामी काळात स्पष्ट होईल, असे काही होणार असेल तर सगळ्यांसमोर येईल, अशी प्रतिक्रिया भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत – विजय वडेट्टीवार

एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या बैठकीबाबत मीही ऐकले आहे. हा त्यांच्या पक्षातील अंतर्गत विषय आहे. देशात आणि राज्यात फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. आता नैतिकता, नीतिमत्ता काही राहिलेली नाही. कोण कुठेही जावे, कोणाच्याही मांडीवर बसावे, डाेक्यावर घ्यावे आणि मग पायाखाली तुडवावे अशी राजकारणाची परिस्थती झाल्याचे, काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले.