CM Eknath Shinde denies Operation Tiger and UBT MP: शुक्रवारी सकाळपासून मुंबईसह महाराष्ट्रभरात चर्चा होती ती कथित ‘ऑपरेशन टायगर’ची. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या जवळपास ८ खासदारांची खुद्द शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याशी बैठक झाली असून ते लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळाली. यावरून संबंधित खासदारांनी अशा कोणत्याही बैठकीला आम्ही उपस्थित नव्हतो, असं स्पष्टीकरणदेखील दिलं. मात्र, तरीदेखील या वृत्तावरून तर्क-वितर्कांना उधाण येतच राहिलं. अखेर खुद्द एकनाथ शिंदेंनीच या प्रकरणावर पडदा टाकणारा खुलासा केला असून त्यासंदर्भातली पोस्ट शिवसेनेच्या अधिकृत एक्स हँडलवर शेअर करण्यात आली आहे.
नेमकं काय होतं वृत्त?
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील ८ खासदारांनी बुधवारी ठाण्यात उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचं वृत्त एका वृत्तपत्राने प्रकाशित केलं. मुंबईसह महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील हे खासदार असून त्यांच्या नावांचादेखील उल्लेख करण्यात आला होता. यावरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली. यानंतर उल्लेख करण्यात आलेल्या खासदारांनी विविध वृत्तवाहिन्यांवर दिलेल्या प्रतिक्रियांमध्ये हे वृत्त पूर्णपणे निराधार असून अशी कोणतीही बैठक झाली नसल्याची भूमिका मांडली.
सध्या प्रत्येक खासदार ज्यांच्या-त्यांच्या कामात आहेत. मात्र, जर कोणी अशा बैठकीला गेलं असेल तर त्यांचे फोटो प्रसिद्ध करा. हे सर्व आता का सुरू आहे, याचं कारण आता २४ तारखेला आमच्या पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या बातम्या पेरल्या जात आहेत. या माध्यमातून असं दाखवण्याचा प्रयत्न आहे की, हे पाहा तिकडे काहीच शिल्लक नाही. सर्वकाही आम्हीच आहोत असं दाखवण्याचा हा प्रयत्न सुरू आहे.
अरविंद सावंत, खासदार, उबाठा

संजय राऊत म्हणतात, “ऑपरेशन फडणवीस शिंदेंच्या पक्षाचं करतायत!”
दरम्यान, यासंदर्भात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलं आहे. “ऑपरेशन एकदाच केलं जातं. वारंवार एखाद्या शरीराचं ऑपरेशन केल्याचा दावा केला जातो, तेव्हा ते मृतदेहाचं ऑपरेशन करत असतात. असं बोलणाऱ्यांच्या पक्षाचा देवेंद्र फडणवीसांनी मृतदेह केला आहे. देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या पक्षाचं ऑपरेशन करत आहेत. शिवसेनेचे ९ खासदार एकजुटीनं एकत्र आहेत”, असं ते म्हणाले.
काय आहे एकनाथ शिंदेंचं नेमकं स्पष्टीकरण?
शिवसेनेकडून शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये एकनाथ शिंदेंची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. त्यात एकनाथ शिंदेंनी हे वृत्त म्हणजे केवळ अफवा असून त्यात कोणतंही तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
“उबाठाच्या खासदारांसोबत झालेल्या कथित बैठकीचे वृत्त पूर्णपणे निराधार, खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणारे आहे. अशी कोणतीही बैठक झालेली नाही. उबाठाचे खासदार फुटून शिवसेनेत येणार असल्याच्या बातम्या गेल्या एक-दीड वर्षांपासून पसरवल्या जात आहेत. परंतु, त्यात कोणतेही तथ्य नाही. ती केवळ अफवा आहे. त्यामुळे सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीच्या बातम्या देणे माध्यमांनी टाळले पाहिजे”, अशा शब्दांत एकनाथ शिंदेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.
