कर्जत: यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. हे सरकार जे बोलते ते करून दाखवते. चौंडी विकास आराखड्यासाठीही निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज, रविवारी चौंडी (ता. जामखेड) येथे बोलताना सांगितले. ‘लाडकी बहीण’ योजना बंद होणार नाही, याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त, त्यांचे जन्मस्थळ असलेल्या चौंडी येथे अभिवादन सभेत उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्री दत्तात्रय भरणे, जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले, खासदार रामराव वडकुते, माजीमंत्री अण्णासाहेब डांगे, आमदार गोपीचंद पडळकर तसेच जिल्ह्यातील आमदार व पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर न्याय व स्त्रीशक्तीच्या प्रतीक होत्या. त्यांचे चरित्र स्फूर्ती देणारे आहे. त्या युगप्रवर्तक व त्यांचा राज्यकारभार आदर्श होता. राज्य सरकारने चौंडी विकास आराखड्यासाठी १२०० कोटी रुपये मंजूर केले. या परिसराचा चेहरामोहरा बदलण्याचा शब्द मी दिला आहे. तो कोणत्याही परिस्थितीत पाळणार. यंदा काम पाऊस कमी पडला तरी महायुतीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.

उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार म्हणाल्या, राज्यातील पहिली उपमुख्यमंत्री म्हणून मला चौंडी येथे येऊन नतमस्तक होण्याचा मान मिळाला. चौंडीसाठी अजित पवार अर्थमंत्री असताना मोठे योगदान दिल्याची आठवणही त्यांनी दिली. येथील विकासकामांसाठी सरकार पूर्ण मदत करेल, मात्र ही कामे दर्जेदार व्हावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

स्वागताध्यक्ष सभापती राम शिंदे यांनी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी १२०० कोटींच्या आराखड्याला मंजुरी मिळाली. कामांची निविदा प्रसिद्ध झाली आहे. मात्र आचारसंहिता संपताच भूमिपूजन करण्यात येईल. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या परवानगीने जयंती महोत्सव साजरा केला जात आहे. माजीमंत्री अण्णासाहेब डांगे, आमदार पडळकर यांचे भाषणे झाली.

कर्जमाफीचा लाभ १० दिवसात – कृषीमंत्री

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, चौंडी विकासाचा बाराशे कोटीचा आराखडा बनवताना उपमुख्यमंत्री असताना अजित पवार यांनी मोठी मदत केली. कृषी विभागाच्या माध्यमातून मेंढपाळासाठी वेगळी य़ोजना आणण्याचा प्रयत्न आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या नावे दिल्या जाणाऱ्या कर्जमाफीची योजनेचा आठ ते दहा दिवसात शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल.

मुख्यमंत्री आले आणि लगेच गेले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सकाळी हेलिकॉप्टरने चौंडी येथे आले. त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जन्मस्थळी असणाऱ्या महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन अभिषेक केला. अहिल्यादेवींना अभिवादन केले. त्यानंतर होणाऱ्या अभिवादन सभेला न थांबता त्यांना तात्काळ नवी दिल्ली येथे जावयाचे असल्यामुळे पत्रकारांशी संवाद साधून ते रवाना झाले.