भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर खोचक टीका केली होती. पडळकरांच्या टीकेनंतर महाराष्ट्राचं राजकीय वातावरण तापलं होतं. हे प्रकरण ताजं असताना आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. शरद पवार कधीही कुणाबरोबरही युती करू शकतात. त्यांची कुणीही खात्री देऊ शकत नाही. त्यांच्या राजकारणावर कुणीही विश्वास ठेवत नाहीत, अशा शब्दांत संजय शिरसाट यांनी शरद पवारांना लक्ष्य केलं आहे. संजय शिरसाट यांच्या विधानानंतर राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. हेही वाचा- “अर्थखातं कधीपर्यंत टिकेल, माहीत नाही”, अजित पवारांच्या विधानावर बावनकुळेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “भविष्यात…” शरद पवारांच्या राजकीय कारकीर्दीवर भाष्य करताना संजय शिरसाट म्हणाले, "शरद पवार हे कुणाबरोबर युती करतील आणि कधी कोणत्या पक्षात जातील, याबद्दल कुणीही खात्री देऊ शकत नाही. आज ते 'इंडिया' आघाडीत आहेत, पण उद्या ते दुसरीकडे दिसतील आणि परवा ते 'एकला चलो रे'च्या भूमिकेत दिसतील.परिणामी शरद पवारांच्या राजकारणावर किंवा शरद पवारांनी केलेल्या विधानावर कुणीही विश्वास ठेवत नाही, हे सत्य आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांवर पूर्णपणे भरवसा ठेवणारी एकही व्यक्ती नाही."