scorecardresearch

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “भाजपासोबत कोणती आणि किती मंत्रीपदे…”

शिंदे यांच्यासहीत ३९ शिवसेना आमदारांनी पुकारलेल्या बंडामुळे बुधवारी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला

Shinde BJP Fadnavis
एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरुन नोंदवली राजीनामान्यानंतरची पहिली प्रतिक्रिया

महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासहीत ३९ शिवसेना आमदारांनी पुकारलेल्या बंडामुळे बुधवारी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. याचबरोबर पावणे तीन वर्षांपासून सत्तेत असणारं आघाडी सरकार कोसळले. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदेंनी पहिली प्रतिक्रिया देताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करतानाच भाजपासोबत मंत्रीपदांबाबत चर्चा झालेली नसल्याचं स्पष्ट केलंय. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर शिंदे गटासोबत भाजपाची चर्चा सुरु असल्याच्या बातम्या समोर येत असतानाच अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन शिंदेंनी केलंय.

नक्की वाचा >> …म्हणून फडणवीस उद्याच मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?; शिंदे गटासोबत बैठकीची शक्यता

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर तब्बल १३ तासांनी एकनाथ शिंदेंनी यावर पहिली प्रतिक्रिया ट्विटरच्या माध्यमातून दिली. “वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे हाच आमचा फोकस,” असं ट्विट शिंदेंनी सकाळी पावणे अकरा वाजता केलं.

नक्की वाचा >> मध्यरात्री शिवसेनेचे बंडखोर आमदार गोव्यात दाखल; महाराष्ट्रात येण्याची घाई न करण्याचा चंद्रकांत पाटलांचा सल्ला, कारण…

त्यानंतर पुढच्याच मिनिटाला त्यांनी, “भाजपासोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका,” असंही आवाहन आपल्या समर्थकांना केलं आहे.

नक्की वाचा >> “प्रत्येक प्रसंगात राज ठाकरेंचं नुकसान करणाऱ्या, त्यांची माणसं फोडणाऱ्या, त्यांच्याविरोधात द्वेषाचं राजकारण करणाऱ्या उद्धव ठाकरेंबद्दल…”

आज म्हणजेच ३० जून रोजी सकाळी ११ वाजता भाजपाच्या कोअर ग्रुपच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र भाजपाच्या या बैठकीमध्ये एकनाथ शिंदेंसोबत असणाऱ्या ३९ बंडखोर आमदारांच्या गटासोबत जाण्यासंदर्भात आणि सत्तास्थापनेसंदर्भात चर्चा विनियम होण्याची शक्यता आहे. या बंडखोर आमदारांसोबत दुपारी दीडच्या सुमारास भाजपाच्या कोअर ग्रुपची बैठक होण्याची शक्यता आहे. बंडखोर आमदारांचा गट सध्या गोव्यात वास्तव्यास असल्याने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही बैठक घेतली जाण्याची शक्यात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Eknath shinde first comment after uddhav thackeray resign as cm says have not had discussion with bjp yet scsg

ताज्या बातम्या