Eknath Shinde on BJP Allegation and Pune Graduate Election: राज्यातील विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघात निवडणूक झाली. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे तीन उमेदवार पदवीधर मतदारसंघात विजयी झाले, तर महायुतीचे दोन उमेदवार शिक्षक मतदारसंघात विजयी झाले. मात्र पदवीधरच्या जागा हातातून गेल्यामुळे महायुतीमधील भाजपा आणि शिवसेना (शिंदे) या पक्षात बेबनाव सुरू झाला असून दोन्ही पक्षाच्या प्रवक्त्यांनी एकमेकांना लक्ष्य केले आहे. शिवसेनेने (शिंदे) एका जागेचा हट्ट धरून युतीधर्म पाळला नसल्याची टीका भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केली. तर त्याला शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आले. आता यावर शिवसेनेचे (शिंदे) प्रमुख, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

पुणे पदवीधरबाबत काय म्हणाले?

शिवसेनेने मदत केली असती तर महायुतीचे उमेदवार निवडून आले असते, असा आरोप भाजपाने केला होता. याबद्दल प्रश्न विचारला असा एकनाथ शिंदे म्हणाले की, जर आणि तरला अर्थ उरत नाही. शिवसेना नेहमीच युतीधर्म पाळते. शिवसेना आणि भाजपा युती चार ठिकाणी होती. पुणे पदवीधर मतदारसंघात शिवसेना (शिंदे) पुरस्कृत आणि भाजपाचा उमेदवार अशी मैत्रीपूर्ण लढत होती. शिवसेनेने नेहमीच युतीधर्म पाळला आहे आणि युतीधर्म पाळला जावा, अशी आमची भूमिका आहे.

भाजपा-शिवसेनेचा नेमका वाद काय?

शिवसेनेने महायुतीचा धर्म पाळून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सहकार्य केले असते, तर पाचही जागांवर महायुतीचा विजय झाला असता, असा दावा भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला. एका जागेसाठी मित्रपक्षांचे नुकसान करण्याची भूमिका युतीसाठी घातक असल्याचेही त्यांनी म्हटले.

“शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत पुणे आणि नागपूरमध्ये मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने अपेक्षित सहकार्य केले नाही. पुण्यात ऐनवेळी सचिन सानप यांना पाठिंबा देऊन शिवसेनेने महायुतीच्या एकजुटीलाच धक्का दिला. त्यांना मिळालेली मते पदवीधर निवडणुकीत भाजपाला मिळाली नाहीत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार यांनी तर थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात प्रचार केला. त्याचाही फटका बसला”, अशी टीका बन यांनी केली.

पुर्णेकर हत्या प्रकरणावरही भाष्य

यानंतर एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात गाजत असलेल्या प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरही भाष्य केले. ठाण्यातील शिवसेनेचे (ठाकरे) विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणामुळे शहरातील वातावरण तापले असून ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यानंतर शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख आणि ठाण्याच्या माजी महापौर, नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यावरही एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मीनाक्षी शिंदे यांनी माझ्याकडे त्यांचा राजीनामा पाठवला आहे. जी घटना घडली, ती दुर्दैवी असल्याचे त्या म्हणाल्या.

ते म्हणाले, “हत्येची घटना दुर्दैवी आणि वाईट आहेच. पण इतर राजकीय पक्ष या घटनेचे राजकारण करत असून ते त्याहून दुर्दैवी आहे. या राजकारणातूनच मीनाक्षी शिंदे यांचे नाव या गुन्ह्याशी वारंवार जोडले गेले. यातूनच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.”

आम्ही पूर्णेकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून जे जे दोषी असतील त्यांच्यावर चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी मी आधीपासून करत आहे. पण या घटनेचे राजकारण ठाण्याच्या बाहेरील लोक करत आहेत. परवा नौपाडा येथील रस्ता अडवला गेला. जाळपोळ करण्यात आली. ठाणेकर शांत आहेत, ते याला योग्य वेळी उत्तर देतील, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.