Premium

लोकसभेसाठी भाजपा-शिंदे गटाचा फॉर्म्युला ठरला? शिंदे गट राज्यात २२ जागांवर तयारी करणार, राहुल शेवाळे म्हणतात…

राहुल शेवाळे म्हणतात, “कुणाच्या बोलण्यावर या निवडणुका नसतील. विकसकामांवर, केलेल्या कामांवर, बाळासाहेबांच्या विचारांवर आमचा विजय निश्चित आहे!”

eknath shinde devendra fadnavis
शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षात जागावाटप ठरलं? (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी रात्री शिंदे गटाच्या खासदारांची आढावा बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी १३ खासदारांच्या कामगिरीचा आढावा घेतला. यावेळी पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भातही या बैठकीत चर्चा झाली. भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट यांच्यात कशा प्रकारे जागावाटप होणार? याविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता ताणली गेली होती. मात्र, रात्री बैठक संपल्यानंतर टीव्ही ९ ला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये राहुल शेवाळेंनी याबाबतचे सूतोवाच केले आहेत. त्यानुसार, शिंदे गट लोकसभेच्या २२ जागा लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले राहुल शेवाळे?

मुख्यमंत्र्यांबरोबरची बैठक संपल्यानंतर राहुल शेवाळेंनी बैठकीत नेमकी कशावर चर्चा झाली, याबाबत माहिती दिली. “सर्व खासदारांची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून ही आढावा बैठक होती. शिवसेनेच्या १३ खासदारांच्या लोकसभेच्या कामाचा त्यांनी यावेळी आढावा घेतला. यावेळी लोकसभा निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने काय करायचं याबाबत चर्चा झाली”, असं राहुल शेवाळे म्हणाले.

१३ मतदारसंघांमध्ये संयुक्त मेळावे होणार

दरम्यान, शिंदे गटाच्या विद्यमान १३ खासदारांच्या मतदारसंघांमध्ये भाजपा-शिवसेना-आरपीआयचे संयुक्त मेळावे होतील, अशी माहिती शेवाळेंनी दिली. “१३ खासदारांच्या लोकसभा मतदारसंघांच्या ठिकाणी शिवसेना-भाजपा-आरपीआयचे संयुक्त मेळावे घेण्याचा निर्णय झाला. या सर्व लोकसभा मतदारसंघांत मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून विकासकामे हाती घेतली जातील”, असं त्यांनी नमूद केलं.

भाजपा-शिंदे गट जागावाटपाचा फॉर्म्युला?

दरम्यान, भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट यांच्यात जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा चालू असून राहुल शेवाळेंनी दिलेली माहिती हे जागावाटप नेमकं कसं असेल, याबाबत सूचित करणारी ठरल्याचं बोललं जात आहे. “शिवसेनेने ज्या २२ जागांवर लोकसभा निवडणूक लढवली, त्या २२ जागांबाबत तयारी करण्यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली. त्यामुळे १३ विद्यमान खासदार आणि इतर जागांचा आढावा घेतला जाईल आणि त्या दृष्टीकोनातून लोकसभा निवडणुकीची तयारी केली जाईल”, असं ते म्हणाले.

VIDEO: “पत्रकाराने अमित शाहांना आरसा दाखवला”, ‘तो’ व्हिडीओ ट्वीट करत काँग्रेसची प्रतिक्रिया, म्हणाले…

संजय राऊतांना टोला

दरम्यान, शिंदे गटाच्या १३ खासदारांपैकी एकही खासदार निवडून येणार नाही, असा दावा संजय राऊतांनी केल्यासंदर्भात विचारणा करताच राहुल शेवाळेंनी त्यांना टोला लगावला. “कुणाच्या बोलण्यावर या निवडणुका नसतील. विकसकामांवर, केलेल्या कामांवर, बाळासाहेबांच्या विचारांवर आमचा विजय निश्चित आहे”, असं ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-05-2023 at 08:02 IST
Next Story
कोकण रेल्वेच्या आरक्षणातील काळय़ा बाजाराची चौकशी करा, अजित पवार यांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र