गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेची जोरदार चर्चा पाहायला मिळत होती. या सभेतून मविआचे नेते आगामी वाटचालीविषयी नेमकी कोणती भूमिका मांडणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्यातच, रामनवमीच्या पूर्वसंध्येला शहरात निर्माण झालेल्या दंगलसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आजच्या सभेबाबत कमालीची उत्सुकता पाहायला मिळाली आहे. यासंदर्भात बोलाताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी टीव्ही ९ शी बोलताना थेट उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली”

“दुर्दैवं हे आहे की आम्ही त्या उद्धव ठाकरेंना पाहिलं आहे जे अमित शाह, नरेंद्र मोदींच्या मांडीला मांडी लावून बसायचे. एक राष्ट्रीय व्यक्तिमत्व उद्धव ठाकरेंचं तयार झालं होतं. पण आज शरद पवारांनी त्यांना त्यांची जागा दाखवली. तुम्ही त्या स्तराचे नाही आहात. आज तुम्हाला कोणत्या स्तरावर आणून बसवलंय? अजित पवार, नाना पटोले यांच्याबरोबर त्यांना सभा घेण्याची गरज पडली आहे. शरद पवार आज नागपूरला आहेत. पण ते का नाही आले? आता उद्धव ठाकरेंना गरज आहे की त्या इतर नेत्यांनी यावं त्यांच्याबरोबर. माझ्या माहितीप्रमाणे संध्याकाळी विमानाने सगळं वऱ्हाड घेऊन येणार आहेत ते”, असं संजय शिरसाट म्हणाले.

“एकनाथ शिंदे गुळगुळीत दाढी करून फिरणार आहेत का?” संजय राऊतांचा खोचक सवाल; म्हणाले, “आधी मिंधे गटानं…”

“आज संविधानाची शपथ घेणार आहेत. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, त्यांच्या नातूबरोबर तुमची युती झाली ना? ते प्रकाश आंबेडकर कुठे आहेत? ते का नाहीत स्टेजवर? म्हणजे तुम्हाला जेव्हा गरज असेल, त्या वेळेला तुम्हाला लोकांचा वापर करायचाय. याचा फायदा खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेसला होणार आहे. उद्याचा मुख्यमंत्री कोण? हा प्रश्न कुणाला विचारला, तर ते पटकन म्हणतील अजित पवार. उद्धव ठाकरे का नाहीत? तर लोक म्हणतील त्यांचं काय राहिलंय आता?” असंही संजय शिरसाट म्हणाले.

“तेव्हा किती खोके घेतलेत?” शिरसाट यांचा सवाल

आज सभेत गद्दार, खोके, आणखीन काय काय हेच बोलणार आहेत ते. माझा त्यांना सवालच आहे आज. या सभेत त्यांनी स्पष्टच करावं की गडाखांना कॅबिनेट मंत्री का केलं? आणखीन दोन अपक्ष आमदारांना मंत्री का केलं? बहुमताला आकडा कमी पडत नव्हता. मग किती खोके घेऊन यांना मंत्रीपद दिलं तुम्ही? असंच तर नाही देत ना कुणाला मंत्रीपद? तुमच्या पक्षात आले का ते? नाही. तुम्हाला त्यांच्या पाठिंब्याची गरज होती का? नाही. मग खोके किती घेतलेत? आज सभेत बोलताना लोकांना सांगा की होय आम्ही गडाखांना कॅबिनेट मंत्री केलं, पण एकही रुपया घेतला नाही हे आम्ही बाळासाहेबांची, देवाची शपथ घेऊन सांगतो”, अशा शब्दांत संजय शिरसाट यांनी उद्धव आव्हान दिलं आहे.

“धर्मराजा सांग.. अदानींच्या कंपनीत २० हजार कोटी कुणी गुंतवले?” संजय राऊतांचा मोदींना टोला; महाभारतातील ‘त्या’ प्रसंगाचा केला उल्लेख!

“शिवसेनेचे ५६ आमदार नव्हते का? त्यांच्यातल्या कुणाला मंत्री केलं असतं तर काय वाईट झालं असतं का? गडाख का? अपक्षाला का? काय तुमचं त्यांच्यावाचून अडलं होतं? तुमच्या कोणत्या पक्षाच्या बैठकीत तो माणूस कधी बसलाय? खोक्यांशिवाय तर काम झालं नसेल. त्यामुळे आरोप करताना आपण किती काय केलंय, हेही एकदा जनतेसमोर येऊ द्या. आजच्या सभेत त्यांनी कृपा करून सांगावं की आम्ही उदार मनाने दोन राज्यमंत्री आणि एक कॅबिनेट मंत्री असेच दिलेत. आमची इच्छा होती. आमच्या माणसाला काही मिळो किंवा न मिळो, यांना मिळालं पाहिजे म्हणून कदाचित त्यांनी ते दिलं. असं तरी त्यांनी सांगावं”, असंही शिरसाट म्हणाले.

“मूळ प्रवाहात आल्याचा आम्हाला आनंद”

“एवढे लोक तुम्हाला सोडून गेले याचा अर्थ तुमची त्यांच्यासोबतची वागणूक योग्य नव्हती. अशा वागणुकीमुळे पक्षात असंतोष वाढला. भाजपाबरोबर गेल्यामुळे आम्ही काही मोठे झालो नाहीत. पण मूळ प्रवाहात आल्यामुळे आम्हाला आनंद आहे”, असं संजय शिरसाट यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde fraction sanjay shirsat challenge uddhav thackeray mva rally in sambhaji nagar pmw
First published on: 02-04-2023 at 11:40 IST