भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांनी यानंतर बैठकीबाबत माहिती दिली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

सुरक्षेच्या दृष्टीने उपाय करणे, लोकांना निर्देश देणं. मॉक ड्रील काही ठिकाणी झालं आहे. काही ठिकाणी होणार आहे. लोकांना निर्देश सायरनच्या माध्यमातून दिले जातील किंवा मोबाइल अॅपच्या माध्यमातून दिले जातील. कोस्टल एरिया, पोलीस यांच्या समन्वयावर चर्चा झाली असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. सुरक्षेच्या दृष्टीने जे आवश्यक आहे ते उपलब्ध करुन देण्याबाबत चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्यातल्या सुरक्षा सचिवांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चर्चा केली. त्यानंतर या बैठकीत काय चर्चा झाली ते सांगितलं.

सोशल मीडियावरुन खोट्या बातम्या पसरवल्यास कारवाई-एकनाथ शिंदे

येत्या दोन ते तीन दिवसांत नौदल, वायूदल, लष्कर, भारतीय तटरक्षक दल यांच्याशीही चर्चा होईल. महाराष्ट्र शासनाकडून जे काही सहकार्य हवं असेल त्याबाबतही चर्चा होईल. आज सुरक्षा सचिवांची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत झाली आहे. मुंबई आणि महाराष्ट्र कुठल्याही परिस्थितीत सुरक्षित ठेवला जाईल या पद्धतीने सगळ्यांनाच अलर्ट करण्याची चर्चा आज झाली. तसंच खोट्या बातम्या सोशल मीडियावरुन पसरवल्या जातात तो गंभीर गुन्हा आहे. त्यावरही कठोर कारवाई झाली पाहिजे याबाबतही चर्चा आणि निर्णय झाला आहे. लोकांना आमची विनंती आहे की सैन्य दलांकडून, तट रक्षक दलांकडून जी काही तयारी केली जाते आहे त्याचं चित्रीकरण करुन, व्हिडीओ काढून प्रसारित करु नये. सुरक्षेच्या दृष्टीने ते महत्त्वाचं आहे, त्याबाबतही चर्चा झाली. असंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले निर्देश पुढीलप्रमाणे…

  • प्रत्येक जिल्ह्यात मॉकड्रिल करा आणि जिल्हा स्तरावर वॉर रूम स्थापित करा.
  • ब्लॅकआऊटवेळी हॉस्पिटलसोबत समन्वय यंत्रणा उभी करा. टार्गेट होऊ नये म्हणून लाईट बंद केले जातात, त्यामुळे पर्यायी विद्युत व्यवस्थेद्वारे यंत्रणा सुरू ठेवून, गडद रंगाचे पडदे अथवा गडद रंगाच्या काचा वापरून त्याचवेळी बाहेरून लाईट दिसणार नाही, अशी व्यवस्था करा.
  • ब्लॅकआऊट म्हणजे काय आणि अशावेळी काय करावे, यांचे व्हिडिओ विद्यार्थी, नागरिकांपर्यंत पोहोचवा. व्यापक जनजागरण करा.
  • केंद्र सरकारच्या ‘युनियन वॉर बुक’ चे सखोल अध्ययन करीत सर्वांना त्याची माहिती द्या.
  • प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या सायबर सेलने समाजमाध्यमांवर देखरेख ठेवत पाकिस्तानला मदत करणारे हॅण्डल ओळखून त्यावर कारवाई करा. शत्रूला मदत करणारी अथवा चुकीची माहिती कुणी प्रसारित करीत असेल तर त्यावर कारवाई करा.
  • प्रत्येक जिल्हाधिकारी यांना आपत्कालीन फंड आजच देणार, ज्यातून काही तातडीच्या साहित्याची खरेदी करायची असतील तर ती तत्काळ करता येईल. याव्यतिरिक्त कोणताही महत्वाचा प्रस्ताव यासंदर्भात आला तर तो 1 तासात मंजूर करा.
  • एमएमआर क्षेत्रातील सर्व महापालिकांची बैठक घ्या, त्यांनाही ‘ब्लॅकआऊट’ बाबत जागरूकता निर्माण करण्यास सांगा. यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांना सहभागी करून घ्या.
  • पोलिस विभागाने नेहमीपेक्षा जास्त जागरूकता ठेवावी. देशद्रोही व्यक्तींच्या कारवाया वाढण्याची शक्यता पाहता अधिक कोंबिग ऑपरेशन करा आणि गस्त अधिक चोख करा.
  • सैन्याच्या तयारी संबधित गतिविधीचे चित्रिकरण करणे आणि ते समाजमाध्यमांवर प्रसारित करणे हा गुन्हा आहे, त्यावर तत्काळ गुन्हे दाखल करा.
  • सागरी सुरक्षा वाढविण्यासाठी आवश्यकतेनुसार फिशिंग ट्रॉलर्स भाड्याने घ्या
  • नागरिकांना परिस्थितीबाबत अद्ययावत व खरी माहिती पोहोचवणे यासाठी शासनाकडून व्यवस्था उभी करा.
  • शासनाच्या अतिमहत्वाच्या पायाभूत सुविधा (उदा. विद्युतनिर्मिती, वितरण) यावर सायबर हल्ले होण्याची शक्यता लक्षात घेता सायबर विभागाकडून त्वरित सायबर ऑडिट करून घ्या
  • सरकार आणि सुरक्षा यंत्रणा यात अधिक समन्वयासाठी मुंबईतील सैन्याचे तिन्ही दल तसेच कोस्टगार्डच्या प्रमुखांना पुढील बैठकीत व्हीसी माध्यमातून निमंत्रित करा.