scorecardresearch

“संजय राऊतांना तुरुंगात नवाब मलिकांनी काय सांगितलं असेल..”, गुलाबराव पाटलांचा खोचक टोला!

गुलाबराव पाटील म्हणतात, “खोके खोके काय करता? जनता कोरोनाला विसरून गेली. तुमचे खोके कधी विसरून जाईल तुम्हाला कळणार नाही. खोक्याच्या भरंवशावर…!”

“संजय राऊतांना तुरुंगात नवाब मलिकांनी काय सांगितलं असेल..”, गुलाबराव पाटलांचा खोचक टोला!
गुलाबराव पाटील यांचा संजय राऊतांना टोला!

शिवसेना खासदार संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून तुरुंगात आहेत. राज्यात सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामना एकीकडे सुरू असताना दुसरीकडे शिवसेना विरुद्ध शिंदे गट असाही कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. संजय राऊत यांना जामीन नाकारण्यात आल्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्यात संजय राऊत अनुपस्थित असणार हे स्पष्ट झालं आहे. मात्र, यावरूनच शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी खोचक टोला लगावला आहे. त्यासोबतच, चरणसिंग थापा शिंदे गटात आल्यावरून शिवसेनेवर तोंडसुख घेतलं आहे.

“थापांना काय MLC व्हायचं होतं का?”

दसरा मेळाव्याला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना गुलाबराव पाटील यांनी धुळ्यात एका कार्यक्रमात बोलताना शिवसेनेवर आगपाखड केली आहे. बाळासाहेब ठाकरेंची शेवटपर्यंत सेवा करणारे चरणसिंग थापा नुकतेच शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यावरून शिवसेनेनं टीका केल्यानंतर आता गुलाबराव पाटील यांनी त्यावरून हल्लाबोल केला आहे.

“उद्धव ठाकरेंचा कुणावरच विश्वास राहिलेला नाही. हाबू हाबू करून सर्वांना ते पळवत आहेत. ज्यानं बाळासाहेबांची सावलीसारखी सेवा केली, त्या चरणसिंग थापावर तुमचा विश्वास राहिला नाही. गुलाबराव पाटील मंत्रीपदासाठी शिंदे गटात गेला असं म्हणता.मग चरणसिंग थापाला काय एमएलसी व्हायचं होतं का?” असा सवाल गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

“एखाद्या माणसाला गुंगीचं औषध देऊन कुणीही घेऊन जातं तसं वाटायला लागलं आहे. आम्ही जेव्हा तुमच्यासोबत होतो तेव्हा खुद्दार होतो, आता गद्दार झालो. तुमच्यासोबत होतो तेव्हा गरीब होतो. आता खोकेवाले झालो?” असाही सवाल पाटील यानी उपस्थित केला आहे.

“मी लिहून देतो, ज्या दिवशी धनुष्यबाण…”, गुलाबराव पाटलांचं शिवसेनेवर टीकास्र; दिला ‘हा’ इशारा!

“जनता करोनाला विसरली, खोके…”

“खोके खोके काय करता? जनता कोरोनाला विसरून गेली. तुमचे खोके कधी विसरून जाईल तुम्हाला कळणार नाही. खोक्याच्या भरंवशावर मत मिळत नाही. विकाऊ असतो तर आठ मंत्र्यांनी राजीनामे दिले नसते. छाताडावर भगवा झेंडा घेऊन बाहेर निघालो आहे. आम्ही जे केलंय ते सांगून केलंय. ऐऱ्यागैऱ्याची औलाद नाहीये”, असंही पाटील म्हणाले.

संजय राऊत मेळाव्यात आले तर…

दरम्यान, संजय राऊत जर दसरा मेळाव्यात आले, तर काय होईल? अशी विचारणा पत्रकारांनी करताच गुलाबराव पाटील यांनी नवाब मलिक यांचं नाव घेत त्यावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे. “दसरा मेळाव्यात संजय राऊत आलेत तर त्यांना टीका करता येईल का? हे सर्वात महत्त्वाचं आहे. जेलमध्ये नवाब मलिक यांनी संजय राऊतांना काय सांगितलं असेल माहिती नाही”, असं ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या