वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यावरून सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. दोन्ही बाजूंकडून प्रकल्प गुजरातला गेल्याबद्दल एकमेकांवर आरोप करण्यात येत आहेत. मविआ सरकारच्या काळात या प्रकल्पाविषयी चर्चा सुरू झाली होती. मात्र, नुकतीच या कंपनीने गुजरातमध्ये प्रकल्प नेण्याची घोषणा केल्यामुळे त्यावरून वाद निर्माण झाला. एकीकडे कंपनीनं महाराष्ट्रात देखील गुंतवणूक करणार असल्याचं ट्विटरवर जाहीर केलं असताना या प्रकल्पावरून राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे.
वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्पाच्या मुद्द्यावरून शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केला आहे. ‘हा प्रकल्प आधीच्या सरकारच्या डिलिंगमुळे बाहेर गेला’ , असा दावा त्यांनी केला आहे.




काय म्हणाले संजय शिरसाट?
“हा प्रकल्प आला कधी? एखादी कंपनी स्थापन करायची असेल, तर कंपनीचा मालक वर्षभरापासून नियोजन करत असतो. तो यांना भेटला असेलच. शिंदे गट-भाजपाचं सरकार येऊन दोन महिने झाले. दोन महिन्यांपूर्वी कंपनीकडून सर्व प्रक्रिया केली असेल. पण मला मिळालेल्या माहितीनुसार टक्केवारीमुळे हा प्रकल्प इथून गेला आहे. आधीच्या राज्यकर्त्यांची डील झाली नाही. यांची डील झाली नाही, म्हणून हा प्रकल्प इथून गेला आहे. त्याचे पुरावेही मी जाहीर करणार आहे”, असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे.
“आमच्या हाती काही पुरावे लागलेत”
दरम्यान, आधीच्या सरकारच्या विरोधात काही पुरावे हाती लागल्याचा दावाही संजय शिरसाट यांनी केला. “हा प्रकल्प जाऊच नये, या मताचे आम्हीही होतो. हा प्रकल्प दोन महिन्यांच्या कालावधीत गेलेला नाही. यांनी (आधीच्या सत्ताधाऱ्यांनी) त्यांच्या फायद्याचं गणित बघितलं. कंपनीवाला तुमच्यासाठी कंपनी टाकत नाही. तो त्याच्या फायद्यासाठी कंपनी टाकत असतो. पण प्रत्येक गोष्टीत डीलिग झाल्याचं समोर येतंय. आता ते ज्या बोंबा मारतायत, त्यावर आम्ही पुरावे समोर मांडू. आमच्या हाती काही पुरावे लागले आहेत”, असंही शिरसाट यांनी म्हटलं.
५ तारखेला काय होणार?
यावेळी बोलताना संजय शिरसाट यांनी येत्या ५ तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात या सर्व प्रकरणावर बोलणार असल्याचं सांगितलं. “त्यांचं खोके, धोके असं सगळं सध्या चाललंय. ५ तारखेला आमच्या दसरा मेळाव्यात शिंदे त्याचं उत्तर देतील”, असा इशारा त्यांनी दिला.
संजय शिरसाट खरंच नाराज आहेत?
आपल्या नाराजीच्या वृत्तावरही संजय शिरसाट यांनी यावेळी भूमिका स्पष्ट केली. “मी स्पष्टपणे सांगतो की माझ्या नाराजीच्या बातम्या दरवेळी येतात आणि मला त्याचा त्रास होतो. दरवेळी मला त्यावर स्पष्टीकरण द्यावं लागतं. मी एकनाथ शिंदेंनाही याबाबत भेटलो. या अफवा थांबवा, नाहीतर मला मानहानीचा दावा दाखल कारवा लागेल. एकनाथ शिंदेंसोबत आम्ही काही मिळवण्यासाठी गेलो नाहीये. मंत्रीपद, उपनेतेपद या अपेक्षेने गेलो नाही, तर एका वेगळ्या ध्येयानं गेलो आहे. एकनाथ शिंदेंवर आम्ही जेव्हा विश्वास ठेवला, तेव्हा हा विचार केला नाही की आमचं काय होईल. आम्ही हा विचार केला की एकनाथ शिंदे महाराष्ट्राला आणि शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे घेऊन जातील. मी आजही एकनाथ शिंदेंसोबत आहे, उद्याही आहे आणि परवाही राहणार आहे”, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.